मुंबई : Rain in Konkan : चेरापुंजीनंतर सर्वाधिक पाऊस कोठे पडतो, असा कोणी प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर कोकण (Konkan) हेच असते. मात्र, सर्वाधिक जास्त पाऊस काल आणि आज झाल्याचे पावसाच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. कोकणात अतिवृष्टी झालेय. तर रायगड जिल्ह्यात मुरूडमध्ये ढगफुटी झाली. गेल्या 24 तासांत कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात (Ratnagiri) आतापर्यंतचा हा विक्रमी पाऊस म्हणावा लागेल. तर रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात 475 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात 357 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर चिपळूणमध्ये 207 मि. मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात एकूण 912.90 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. (Rainfall in Ratnagiri, Sindhudurg and Raigad districts)
सोमवारपासूनच रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात जोरदार पावसाला (Heavy Rain) सुरुवात झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत (Dapoli) सोमवारी रात्री अतिमुसळधार पावसाने झोडपून काढले. दापोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शहरातील सखल भागांत, नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. तर चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीला पूर आल्याने पुराचे पाणी रात्री शहरात शिरले होते. त्यामुळे पुन्हा पूर येण्याच्या भीतीने नागरिक भयभित झाले होते.
रत्नागिरी जिल्ह्याला गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसाचा फटका दापोली आणि चिपळूण शहराला बसला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. वाशिष्ठी नदीला पुन्हा पूर आल्याने पुराचे पाणी शहरात घुसले होते. सध्या कोकणात धो धो पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. रत्नागिरीत 89 मि.मी. दापोलीत - 357, चिपळूण -207, राजापूर - 64, लांजा 102, गुहागर -135, दापोली - 357 मि.मी पावसाची नोंद झाली असून तालुक्यात वाकवली - 109, पालगड -29, आंजर्ले - 226, दाभोळ - 235, बुरोंडी - 270, वेळवी -45 मि.मी इतकी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 3148.28 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत देवगड तालुक्यात सर्वाधिक 75 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 46.3 मि.मी. पाऊस झाला असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 3354.9825 मि.मी. पाऊस झाला आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 391.5970 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 87.53 टक्के भरलं आहे. गेल्या चोवीस तासांत या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 94.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तर रायगड जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. अलिबागमध्ये 18 मि.मी. पेण तालुक्यात 7 मि.मी. इतकी सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. तर मुरुड तालुक्यात 475 मि.मी विक्रमी पाऊस झाला आहे. रोहा तालुक्यात 46 मि.मी. श्रीवर्धनमध्ये 153 मि.मी., म्हसाळा येथे 105, सुधागड येथे 35 मि.मी पावसाची नोंद झाली आहे.