Pune Porshce Accident : 'व्हायरल होणारा तो व्हिडीओ खोटा', अल्पवयीन मुलाची आई हात जोडून म्हणाली...

पोर्शे गाडीने 2 जणांना ठार केल्यानंतर त्या अल्पवयीन मुलाने एक व्हिडीओ केल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता त्याच्या आईने या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. 

नम्रता पाटील | Updated: May 24, 2024, 10:11 AM IST
Pune Porshce Accident : 'व्हायरल होणारा तो व्हिडीओ खोटा', अल्पवयीन मुलाची आई हात जोडून म्हणाली... title=

Pune Porsche Car Accident Mother Reaction : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे गाडीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. आता पुण्यातील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. कल्याणीनगर परिसरात पोर्शे गाडीने 2 जणांना ठार केल्यानंतर त्या अल्पवयीन मुलाने एक व्हिडीओ केल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण आता त्याच्या आईने या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. 

व्हायरल व्हिडीओवर आईची प्रतिक्रिया

पुण्यातील कल्याणी नगर परिसरात पोर्शे कार चालवत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका दुचाकीला धडक दिली होती. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत एक मुलगा रॅप साँग करताना दिसत होता. हा व्हिडीओ पुण्यातील त्या मुलाचा असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र प्रत्यक्षात तो व्हिडीओ एका युट्यूबर असलेल्या इन्फ्लुएन्सरचा असल्याचे समोर आले आहे. 

त्यासोबतच या व्हिडीओवर त्या अल्पवयीन मुलाच्या आईनेही प्रतिक्रिया दिली आहे. मी सर्व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना विनंती करते की, सोशल मीडियावर व्हायरल होणारा तो व्हिडीओ माझ्या मुलाचा नाही. तो व्हिडीओ खोटा आहे. माझा मुलगा सध्या बाल सुधारगृहात आहे. पोलिसांनी माझ्या मुलाचे सरंक्षण करा, ही मी त्यांना विनंती करते, असे त्या मुलाच्या आईने या व्हिडीओत म्हटले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

अलिशान गाडीची फॉरेन्सिक तपासणी

आता पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी अलिशान गाडीची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली आहे. यावेळी 'फॉरेन्सिक' तपासणीत गाडीची वेग मर्यादा, गाडीतील कॅमेरे, चित्रीकरण, अपघातानंतर झालेली मोटारीची स्थिती याचा आढावा पथकाने घेतला. यानंतर आता लवकरच याबद्दलचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.

तर दुसरीकडे पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या नातेवाईकांचा मुजोरपणा पाहायला मिळत आहे. अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना चौकशीसाठी आणलं जात असताना मीडियानं गराडा घातला. यावेळी काही मीडिया प्रतिनिधी आणि अग्रवाल यांच्या नातेवाईकांमध्ये वाद झाला. त्यापैकी एका व्यक्तीने कॅमेऱ्यावर हात मारल्याने एकच गोंधळ उडाला आणि वादावादी सुरू झाली.याप्रकरणी पुणे अपघात दुर्घटनेचा खेद असल्याची प्रतिक्रिया अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी दिली आहे. तर आपला नातू अल्पवयीन आहे. त्यामुळे त्याचा खटला अल्पवयीन म्हणूनच चालवावा अशी विनंतीही त्यांनी केली आहे. 

अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द

दरम्यान पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी आरोपीचे वडिल विशाल अग्रवालला 24मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्यासोबत पबचे कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश बोनकरलाही 24मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यासोबतच पुणे कल्याणीनगर अपघातप्रकरणी बाल हक्क न्यायालयाने अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करण्यात आला आहे. मुलाची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात येणार आहे. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं हा निकाल देण्यात आला होता.