Who's Blood Was Sent By Taware From Sassoon Hospital: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांना अटक करण्यात आली आहे. या मुलाच्या रक्ताऐवजी नेमकं कोणाचं रक्त घेण्यात आलं होतं याची माहिती समोर आली आहे. तावरेंच्या आदेशानंतर हळनोरने एका महिलेच्या रक्ताचा नमुना घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच या प्रकरणामध्ये स्थापन करण्यात आलेल्या समितीनेही काही शिफारशी केल्या आहेत.
कल्याणी नगरमधील पोर्शे कारच्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांनी फेरफार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही डॉक्टरांना रविवारी रात्री (26 मे 2024 रोजी) उशीरा अटक केली. तसेच सोमवारी पोलिसांनी ससून रुग्णालयातील शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकांबळेला अटक केली. या तिघांच्या अटकेनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नेमका घटनाक्रम सांगितला होता. तावरेच्या सांगण्यावरुन हळनोरने या मुलाच्या रक्ताचे नमुने घेतले खरे पण ते नंतर कचऱ्यात फेकून दिले. मात्र त्याऐवजी नेमके कोणाचे रक्त पाठवण्यात आलं होतं यासंदर्भात खुलासा करण्यात आलेला नव्हता. यासंदर्भातील खुलासा आता झाला असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वयस्कर व्यक्तींच्या रक्ताचे नमुने हळनोरने घेतले होते. तसेच अन्य एका महिलेच्या रक्ताचे नमुनेही या अल्पवयीन मुलाच्या रक्ताऐवजी घेतले होते. याच महिलेचं रक्त या मुलाच्या रक्ताचे नमुने म्हणून तपासणीसाठी पाठवण्यात आलं होतं.
मेडिको लीगल केस (एमएलसी) प्रकरण हाताळणीसंदर्भात प्रचलित हॉस्पीटल अॅडमिनिस्ट्रेशन मॅन्यूअल अॅण्ड सिव्हीक मेडिकल कोड (Hospital Administration Manual & Civil Medical code) तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम मधील तरतुदींचा एकत्रित विचार करुन समितीने आपला अभिप्राय व शिफारशी कळवल्या आहेत. या शिफारशी काय आहेत पाहूयात...
1) ससून रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्याल परीसरात माध्यम प्रतिनिधी यांच्या वावराबाबत अधिष्ठाता यांनी दक्षता घेतली नाही. (महाराष्ट्र नागरी सेवा हॉस्पीटल अॅडमिनीस्ट्रेशन मॅन्युअल)
2) डॉ. श्रीहरी हळनोर यांनी दिनांक 19 मे 2024 रोजी एमएलसी तपासणी व रक्त नमुने घेताना नियमाचे पालन केलेले दिसत नाही. (चेन ऑफ कस्टडी ऑफ एव्हिडन्स)
3) डॉ. श्रीहरी हरनोल यांनी रक्ताचे नमुन्यांमध्ये बदल करण्याच्या उद्देशाने महिला व दोन वयस्कर व्यक्तींचे रक्ताचे नमुने घेतले.
नक्की वाचा >> Pune Porsche Accident: अपघातानंतर पोलीस स्टेशनला गेलेल्या आमदाराचं अटकेतील डॉक्टरशी कनेक्शन; 6 महिन्यांपूर्वीचं पत्र चर्चेत
4) ऑन ड्युटी आरएमओ व वैद्यकीय अधिक्षक यांनी नियमाप्रमाणे अभिप्रेत असताना एमएलसी कामाची देखरेख केलेली दिसत नाही. (हॉस्पीटल अॅडमिनीस्ट्रेशन मॅन्युअल)
5) प्राध्यापक व न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख असलेल्या डॉ. अजय तावरे यांनी उपभोगलेल्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत तफावत दिसून येते, न्यायवैद्यक विभागाला 25 एप्रिल रोजी पाठवण्यात आलेल्या पत्र क्रमांक 322/2024 नुसार डॉ. अजय तावरे विहित केलेल्या दिर्घ सुट्टीच्या कालावधीत कर्तव्यावर हजर राहणार होते. न्यायवैद्यकशास्र विभागाच्या पत्र क्रमांक 350/2024 मध्ये डॉ. तावरे हे 2 मे 2024 ते 21 मे 2024 दरम्यान दिर्घ सुट्टीवर असतील असं म्हटलं होतं. या दिर्घ सुट्टीच्या दुसऱ्या सत्रात 22 मे पासून ते कार्यरत होतील असं सांगण्यात आलेलं. मात्र 21 मे रोजी तावरे कामावर हजर होते असं बायोमेट्रीकच्या नोंदीवरुन स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नियमानुसार उन्हाळी दिर्घ सुट्टीचा कालावधी केवळ प्रथम अथवा द्वितीय सत्रात उपभोगता येतो तसेच सदरचा कालावधी आपल्या सोयीनुसार विभागून उपभोगण्याकरीता अधिष्ठातांची पूर्व परवानगी आवश्यक असते.
6) अधिष्ठातांनी या प्रकरणाचे शासकीय व सामाजिक गांभीर्य ओळखून यापुर्वीच वेळेत (26 मे 2024 पूर्वी) चौकशी करुन सदरची माहिती शासनास उपलब्ध केली असती तर ससून रुग्णालय प्रशासनाकडून स्वतःहून पोलीस तपासात अधिकचे सहकार्य झाले असते. तसेच ससून रुग्णालयाची व एकंदरीत शासनाची प्रतिमा राखली गेली असती. (महाराष्ट्र नागरी सेवा नियम)
1) अपघात विभाग वैद्यकीय अधिकारी यांनी एमएलसी तपासणी, रक्ताचे नमुने घेणे, लेबल लावणे, सिलबंद करणे व पोलीसांच्या ताब्यात देणे हे व्यक्तीशः व स्वत: च्या देखरेखील करणे अभिप्रेत आहे.
2) अपघात विभागातील इनडोअर एमएलसी आणि ओपीडी एमसली अशी दोन वेगवेगळे रजीस्टर हे एकत्र ठेवणे अभिप्रेत आहे.
3) अंमली पदार्थ सेवनाची शक्यता असलेल्या एमएलसी प्रकरणात रक्ताच्या नमुन्यासह लघवी तपासणी करणे अभिप्रेत आहे. तरी त्याबाबतीत न्याय सहाय्यक प्रयोगशाळा यांच्याशी सल्लामसलत करुन विहित नमुने घेण्यात यावेत.
4) मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याची डयुटी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे न्यायवैद्यक प्रकरण हाताळणी विषयी पिरिऑडिक रिफ्रेशर ट्रेनिंग (Periodic Refresher Training) करणे अपेक्षीत आहे. (सिव्हिल मेडिकल कोड हॉस्पीटल अॅडमिनिस्ट्रेशन मॅन्यूअल ) (Civil Medical Code Hospital Administration Manual)
5) अधिष्ठातांनी ससून रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात माध्यम प्रतिनिधींना नियमाप्रमाणे माहिती देण्यासाठी डॉक्टर अथवा कर्मचारी यांची नियुक्ती करुन सुसुत्रता ठेवावी.