पुण्यात सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी, हंडाभर पाण्यासाठी तुंबळ गर्दी

कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचा कसा फज्जा उडतोय, याचं उदाहरण पुण्यात समोर आलं आहे.

Updated: Apr 23, 2020, 10:14 PM IST
पुण्यात सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी, हंडाभर पाण्यासाठी तुंबळ गर्दी title=

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचा कसा फज्जा उडतोय, याचं उदाहरण पुण्यात समोर आलं आहे. रेकॉर्डब्रेक पाऊस झालेल्या आणि पाणीसाठे ओव्हरफ्लो झालेल्या पुण्यामध्ये हंडाभर पाण्यासाठी तुंबळ गर्दी झाली. पुण्याचं उपनगर असलेल्या उरुळी देवाची परिसरातल्या नागरिकांसाठी हा रोजचाच खेळ आहे. 

पाणी पुरवठा योजनेतल्या पाईपलाईनचं काम रखडल्याचा हा परिणाम आहे. ही पाईपलाईन करून अनेक वर्ष झाली आहेत, पण या पाईपलाईनमधून ग्रामस्थांना आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा पाणीपुरवठा झाला नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. 

पाणी समस्या सोडवण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी योजना हाती घेण्यात आली आहे. मात्र जमीन ताब्यात नसल्यामुळे काम रखडलं आहे. नागरिकांनी पाण्यासाठी गर्दी करू नये, असं आवाहन महापौरांनी केलं आहे. तसंच इथून पुढे हा प्रकार होणार नाही, असं आश्वासन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलं आहे. 

जीवनावश्यक घटक असलेल्या पाण्यासाठी अशी गर्दी होणार असेल तर त्या लॉकडाऊनला काही अर्थ नाही. त्यामुळे आता पाणी नेमकं कुठे मुरतंय? याचा शोध घ्यावा लागणार आहे.