Pune Bopdev Ghat Gang Rape: पुण्यातील बोपदेव घाटात एका तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेला तीन दिवस उलटून गेले तरीही आरोपी अद्याप मोकाटच आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तैनात केली आहेत. त्याचबरोबर आरोपींचा शोध घेण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. तसंच, आरोपीची माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.
सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांचा माहिती संकलित करण्यात येत आहे. त्याआधारे पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. तर पोलिसांकडून दोनशेहून अधिक सराईतांचीही चौकशी करण्यात येणार आहे. गेल्या १५ दिवसांत बोपदेव घाटामार्गे गेलेल्या तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून गोळा करण्यात येत आहे. त्यानुसार तपास सुरू आहे.
तरुणीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी बोपदेव घाटातून सासवडकडे गेल्याचा संशय आहे. घाटापासून 70 ते 80 किमीपर्यंतचे सीसीटीव्ही तपासले जात आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. तसंच, पुणे पोलिसांकडून आरोपीची माहिती देणाऱ्याला बक्षीसही जाहीर करण्यात येणार आहे. तिन्ही आरोपींची माहिती देणाऱ्याला दहा लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली आहे.
बोपदेव घाटातील प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता "सर्च लाईट" बसवण्यात येणार आहे. शहरातील सर्व टेकड्यांवर सायरनसुद्धा बसवले जाणार असून आपत्कालीन परिस्थितीत हा सायरन महत्वाचा ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील बाणेर टेकडीवर एका तरुणाला काही चोरट्यांनी लुटले होते. तसंच, पुण्यातील टेकड्यांवर होणाऱ्या चोऱ्या आणि लूट थांबवण्यासाठी आता पोलिसांकडून मोहीम सुरू होणार आहे.
21 वर्षीय तरुणी तिच्या मित्रांसोबत बोपदेव घाटात फिरण्यासाठी आली होती. त्यावेळी तिथे आलेल्या तीन जणांनी तिच्याच मित्रासमोर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. कोयता, बांबू , धारदार शस्त्र हातात घेऊन आरोपींनी दोघांना धमकावून तरुणीवर अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी दोन संशयित रेखाचित्रदेखील जारी केली असून सीसीटीव्हीसुद्धा पोलिसांच्या हाती लागले आहेत.