आरएसएसच्या कार्यक्रमासाठी प्रणव मुखर्जी नागपुरात दाखल

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी नागपुरात दाखल झाले आहेत.

Updated: Jun 6, 2018, 07:44 PM IST

नागपूर : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. नागपूर विमानतळावर आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. विमानताळहून मुखर्जी थेट राज भवनाकडे रवाना झाले. गुरुवारी दिवसभर त्यांचे कुठलेही नियोजित कार्यक्रम नसून राजभवनातच ते काही लोकांच्या भेटीगाठी घेणार आहेत. यात बंगाली असोसिएशनचा समावेश आहे. दुपारी भोजनासाठी ते रेशीमबाग येथील स्मृती मंदिरात येणार आहेत. त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत आणि तृतीय वर्ष वर्गाच्या प्रशिक्षणार्थींसोबत भोजन घेणार आहेत. त्यानंतर उद्या  संध्याकाळी साडेसहा वाजता समारोपाच्या मुख्य कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 

काय म्हणाले होते मुखर्जी?

प्रणव मुखर्जी यांनी आनंद बजार पत्रिका या बंगाली वृत्तपत्रास एक मुलाखत दिली. या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरादाखल मुखर्जी यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेले निमंत्रण मी स्वीकारले. हे निमंत्रण स्वीकारल्याचे समजताच मला अनेकांची पत्रे आली तसेच अनेकांनी फोनही केले. मी सर्वांची मते ऐकली पण, पण कोणालाही उत्तरे दिली नाहीत. पण, मला जे बोलायचे आहे ते मी नागपूरमध्येच बोलेन. माझी भूमिका मी नागपूरमध्येच मांडेन असे मुखर्जी यांनी म्हटले होते.

रेशीम बाग मैदानात होणार कार्यक्रम

नागपुरातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाच्या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुखर्जी उपस्थित राहणार आहेत. ७ जूनला संध्याकाळी ६.३० वाजता रेशीमबाग मैदानावर होणार आहे. या प्रशिक्षण वर्गाची सुरूवात १४ मे पासून झाली होती. या कार्यक्रमात मुखर्जी नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.