पुणे : एकदा मटका लागला म्हणजे सारखा लागत नाही, अशा शब्दांत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या दानवेंवरील विधानाचा समाचार घेतला. संजय काकडे यांनी लोकसभा निवडणुकीबाबत केलेल्या भाकीतांवर मी विश्वास ठेवत नाही, अशी प्रतिक्रिया प्रकाश जावडेकर यांनी दिली. महाराष्ट्रात युती झाली नाही तर लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसेल. एवढच नाही तर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेदेखील पराभूत होतील, असं मत भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केलं होतं. यावर प्रकाश जावडेकर यांनी हे उत्तर दिलं आहे.
मी दिल्लीमध्ये राहतो, तिकडे सगळे दुचाकीस्वार हेल्मेट घालतात. तसंच पुण्याचा पाणी प्रश्न हा स्थानिक प्रश्न आहे. त्यावर लोकसभा निवडणुका होत नाहीत, असं सांगत प्रकाश जावडेकर यांनी पुण्याच्या प्रश्नावर बोलायचं टाळलं.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात कोलकात्यामध्ये विरोधी पक्षांची रॅली घेण्यात आली. या रॅलीवरही जावडेकर यांनी टीका केली. देशाला मजबूत सरकार पाहिजे का मजबूर सरकार पाहिजे, हाच या निवडणुकीतील मुद्दा असेल. याच मुद्द्यावर लोकसभा निवडणूक लढवली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात कोण? हा आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा दुसरा मुद्दा असेल, असं जावडेकर यांनी स्पष्ट केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मजबूत सरकारनं गरिबांसाठी अनेक योजना दिल्या आहेत. त्यामुळे मतदार मजबूत सरकारलाच पुन्हा कौल देईल, असा विश्वास जावडेकर यांनी व्यक्त केला आहे. अजून ९० दिवसांनी पुण्यात लोकसभेसाठी मतदान होईल, असं भाकीतही जावडेकर यांनी वर्तवलं.
'मेरा घर भाजपका घर' ही मोही लवकरच हाती घेणार असल्याचं प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. या मोहिमेअंतर्गत जे घर भाजपला मतदान करणार आहे, त्या घरावर भाजपचा झेंडा लावला जाणार आहे, असं प्रकाश जावडेकर म्हणाले.