आमदाराच्या स्तुतीवर भुजबळ म्हणाले, "त्यांना राग येतो"

जालना, कोल्हापूर, इगतपुरी, सोलापूर, नागपूर या जिल्ह्यातील आमदारांनी रेशनधान्य दुकानावरील काळाबाजारावर प्रश्न विचारला होता. 

Updated: Mar 11, 2022, 09:06 PM IST
आमदाराच्या स्तुतीवर भुजबळ म्हणाले, "त्यांना राग येतो"  title=

मुंबई : विधानसभेत आज सकाळच्या सत्रात शिधावाटप आणि रेशन दुकानात होणाऱ्या भ्रष्टाचार, गावागावातून लोकांना धान्य मिळत नसल्याबाबत जालना, कोल्हापूर, इगतपुरी, सोलापूर, नागपूर येथील आमदारांनी प्रश्न उपस्थित केला होता.

पाच जिल्ह्यातील आमदारांनी उपस्थित केलेल्या आमदारांच्या या प्रश्नाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सर्विस्तर उत्तर देत त्या आमदारांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात त्यांनी 'नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस राहतात. जर तेथे धान्य मिळाले नाही तर ते गप्प बसतील का? असा खोचक टोला लगावला. त्यावर देवेन्द्रही हसू लागले.

एकावरून एक असे प्रश्न उपस्थित होत राहिले. अशातच राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांना बोलण्याची संधी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिली. आमदार तुपे यांनी, मंत्री भुजबळ साहेब यांनी कोरोना काळात संपूर्ण यंत्रणा चांगल्या पद्धतीने हाताळली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. 

आमदार तुपे यांचे बोलणे सुरु असतानाच भाजप सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यांचा गोंधळ सुरु असतानाही आमदार तुपे यांनी आपले बोलणे सुरूच ठेवले. त्यांना कितीही आरडा ओरडा करू द्या , पण जे चांगले काम केले आहे त्याचे... 

अशावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी उभे राहत म्हणाले, अध्यक्ष महाराज जर त्यांना माझी स्तुती आवडत नसेल तर माझी या माझी सदस्यांना विनंती आहे की त्यांनी माझी स्तुती करू नये.
 
आमदार चेतन तुपे यांनी यावर चांगल्याला चांगलं म्हणणं वाईट आहे का? मी शेतकरी आहे मला शेळ्या, मेंढ्या, कुत्री यांच्या गलक्यात बोलण्याची सवय आहे. यांच्या बोलण्याने मला फरक पडणार नाही, असा टोला लगावला.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी त्यावर हरकत घेत, आमदार तुपे यांनी सभागृहातील सदस्यांची तुलना शेळ्या, मेंढ्या, कुत्रे यांच्याशी केलीय. ते पटलावरून काढण्यात यावे अशी मागणी केली. या मागणीकडे अध्यक्षानी दुर्लक्ष करत तुपे यांना बोलण्यास सांगितले.  

आमदार तुपे यांनी मी सदस्यांना शेळी मेंढ्या म्हणालो नाही. तर मी त्याच्यात राहतो असे म्हटल्याचे सांगितले. भुजबळ यांनी आमदार तुपे यांनी विचारलेल्या त्या प्रश्नाचे उत्तर देत पुढील अधिक वाद टाळला.