Nashik Political News : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर मूळचे शिवसेनेचे कार्यकर्ते शिंदे गटात जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसत आहे. ही पडझड थांबविण्याचे ठाकरे गटाकडून प्रयत्न होताना दिसत आहेत. आता नाशिकचा गड सावरण्यासाठी आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे याही मैदानात उतरणार आहेत. लवकरच त्या महिला मेळावा घेऊ शकतात, अशी माहिती देण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नाशिकचा किल्ला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे मैदानात उतरणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. नाशिकमध्ये रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत महिला मेळावा होण्याची शक्यता आहे. मात्र, अजून मेळाव्याची तारीख निश्चित झालेली नाही. एप्रिलच्या शेवटच्या आठव्यात हा मेळावा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नाशिकमधून माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह 12 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्या पाठोपाठ संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली. मालेगावमधून अद्वैय हिरे यांच्या प्रवेशाने दिलासा मिळाला असून, या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी सभा घेऊन शिंदे गटाला आव्हान दिले आहे. आता शिंदे गटाला आव्हान देण्यासाठी रश्मी ठाकरे मैदानात उतरणार आहेत, तशी चर्चा आहे.
नाशिक जिल्ह्याची जबाबदारी खासदार संजय राऊत यांच्यावरआहे. मात्र, पक्षाची पडझड ते थांबवू शकलेले नाहीत. अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे हा संजय राऊत यांना धक्का असल्याचे बोलले जात आहे. नाशिकचे दोन आमदार आणि एक खासदार शिंदेच्या शिवसेनेत गेले असले तरी दुसरीकडे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेना ठाकरे गटातकह होते. मात्र, त्यानंतर काही महिन्यांनी हळूहळू पदाधिकारी हेदेखील शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेत. यामध्ये महिलांची देखील मोठी फळी ठाकरेंना सोडून शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाल्याने मोठा धक्का मानले जात आहे. महिलांची जबाबदारी या रश्मी ठाकरे स्वत: घेणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रश्मी ठाकरे या नाशिक शहरात महिला मेळावा घेण्याची शक्यता आहे. रश्मी ठाकरे यांचा नाशिकला मेळावा होणार असल्याने जोरदार तयारी केली जात आहे. पक्षातील पडझड रोखण्यासाठी रश्मी ठाकरे यांच्या मेळाव्याला किती यश येते, याची उत्सुकता आहे.