Crime News: माँ... या एका अक्षारामुळे सापडला खुनी; CID पेक्षा भारी स्टोरी

नाशिकमध्ये नदी पात्रात पोलिसांना शीर नसलेला मृतदेह सापडला. काहीच पुरावा नसल्याने ओळखल पटवणे कठीण होते. अखेरीस हातावरील टॅटूच्या मदतीने पोलिसांनी आरोपींना गजाआड केले आहे (Nashik Crime News). 

Updated: Feb 21, 2023, 09:38 PM IST
Crime News: माँ... या एका अक्षारामुळे सापडला खुनी; CID पेक्षा भारी स्टोरी  title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : CID... छोट्या पदड्यावरील सर्वात मोठी लोकप्रिय सिरीयल. या मालिकेतील पात्र, अत्यंत उत्कंठावर्धक पद्धतीने गुन्हेगारी घटनांची उकल करतात.  CID पेक्षा भारी स्टोरी नाशिकमध्ये (Nashik Crime News) घडली आहे.  माँ... या एका अक्षारावरुन पोलिसांनी खुन प्रकरणातील आरोपी शोधून काढला आहे. मोबाईलच्या वादातून ही हत्या झाली आहे. 

मोबाईलच्या घेण्याच्या वादातून नाशिक जिल्ह्यात तरुणाचे शीर कापून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सायखेडा पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. 11 फेब्रुवारीला गोदावरी नदीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळून आला होता.

या मृतदेहाला शीर नसल्याने मृतदेहाची ओळख पटवणे शक्य नव्हते. मात्र, मृतदेहाच्या हातावर हितेश आणि माँ असे गोंदवले होते. या आधारे पोलिसांनी तपास केला असता शरद वसंत शिंदे आणि आलिम शेख या संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अधिक चौकशी केली असता मोबाईल घेण्यावरून वाद झाला होता. या रागातून खून करण्यात आल्याचे संशयीत आरोपी यांनी सांगितले. 

नेमकं काय घडलं?

खेरवाडी येथे जगदीश संगमनेरे व संदीप संगमनेरे या दोघा भावांचे शेत असून या ठिकाणी त्यांनी मागील महिन्यात पेठफाटा येथून हितेश नावाच्या मजुराला शेत कामासाठी आणले होते. तेव्हा पासून हितेश हा शरद आणि अलीम सोबत काम करत होता. दिनांक 7 फेब्रुवारी रोजी हितेश आणि शरद यांच्यात मोबाईल घेण्यावरून किरकोळ करणाहून वाद झाला. 

यात हितेश याने शरद आणि अलीम याला नाशिकहून साथीदार आणून तुमचा बेत पाहतो अशी धमकी दिली होती. यातून संतापलेल्या अलीम याने हितेश याच्या डोक्यात लोखंडी गजाने प्रहार केला. यात हितेश याचा जागीच मृत्यू झाला. त्यांनतर शेतमालक जगदीश संगमनेरे, संदीप संगमनेरे, घटनास्थळी आले आणि त्यांनी हा प्रकार पाहता आपल्या हातून बटाईतसाठी घेतलेली जमीन जाईल, गावात बदनामी होईल या चिंतेने त्यांनी मयत हितेश याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सांगितले. त्यानुसार शरद याने बाजूला पडलेल्या कुऱ्हाडीने मयत हितेश याचे शीर वेगळे करत धड गोदावरी नदीत टाकून दिल्याचे संशयितांनी पोलीस चौकशीत सांगितले आहे. मृत व्यक्तीचे शीर मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही.