नागपूर : कोरोना संसर्गामुळे दररोज हजारोंच्या संख्येने जिल्ह्यात रुग्ण वाढत आहेत. अनेक रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज भासत आहे. त्यामुळे रेमडेसिवीरचा काळाबाजार सर्सास सुरू असल्याचे दिसून येत आहे.
नागपूरमधील पेशाने नर्स असलेल्या एका तरुणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने रेमडेसिवीरचा काळाबाजार केल्याचे निदर्शनास आले आहे. ज्योती अजित आणि शुभम सत्यनिवास अर्जुनवार अशी आरोपींची नावे आहेत.
गायकवाड पाटील परिसरतील कोव्हिड सेंटरमध्ये नर्स असलेली ज्योती मूळची सिवनी येथील आहे. शुभम सोबत तिचे प्रेमसंबध होते. शुभम बांधकाम ठेकेदार आहे. कोरोना रुग्णांच्या अडचणीत स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी ज्योतीने रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरू केला.
रेमडेसिवीरच्या काळाबाजाराच्या कामात तिने आपल्या प्रियकरालाही ओढलं. त्यानेही ज्योतीच्या कामाला मदत केली. आपल्या गर्लफ्रेंडच्या काळाबाजारी कामासाठी त्याने स्मशानभूमीत इंजेक्शन ब्लॅकने विकण्यास सुरूवात केली.
पोलिसांना याची माहिती मिळताच, त्यानी शुभमला गाठले. त्याच्याकडे 5 रेमडेसिवीर इंजेक्शन सापडले. पोलिसांनी त्याला इंजेक्शन कोठून मिळाले याची माहिती विचारल्यास त्यांने उडवाउडवीची उत्तरं दिली. अखेर पोलिसांनी खाक्या दाखवायला सुरूवात केल्यावर ज्योतीलाही ताब्यात घेण्यात आले.
ज्योतीने कोरोना रुग्णांच्या मेडिसिन किटमधून इंजेक्शन चोरल्याची कबूली दिली. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.