पिंपरी : चौफेर टीका झाल्यांतर अखेर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना उपरती झाली आहे. पालखी सोहळ्यात दिंडी प्रमुखांना भेट देण्यास सत्ताधारी भाजपने तयारी दाखवली आहे. पालखी शहरात प्रवेश करत असताना दरवर्षी पिंपरी चिंचवड महानगर पालिका पालखीचे स्वागत करते त्याच वेळी दिंडी प्रमुखांना भेट वस्तू देते. मात्र पैसे वाचवण्याचा मुद्दा पुढे करत यंदा कोणतीही भेटवस्तू न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावर तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
वारीतील पालखी दिंडी प्रमुखांना भेट देण्यास सत्ताधारी भाजपने विरोध केला. मात्र, विरोधकांसह इतरांनीही यावर सडकून टीका केली होती. अखेर सर्व पक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत सर्व नगरसेवकांच्या मानधनातून भेट वस्तू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा पालखी प्रमुखांना पखवाज भेट देण्यात येणार आहे.
या पालखी सोहळयात राज्यभरातून शेकडो दिंड्या सहभागी होणार आहेत. नाशिक त्र्यंबकेश्वर परिसरातील जवळपास ५० हून अधिक दिंड्यांमधून २० ते २५ हजार वारकरी निवृत्ती नाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान हजर राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. ज्ञानेश्वरांची माऊली आणि गुरू स्थान असलेल्या या वारीला आषाढी वारीत अनन्यसाधारण असे महत्व आहे.