Pandharpur wari 2022: संत सोपानकाका यांची पालखी निघाली पंढरीकडे

सासवड मुक्कामी माऊलींची पालखी येताच वारकऱ्यांनी माऊलींचे धाकले बंधू संत सोपानकाका यांच्या समाधीचे दर्शन घेतले. 

Updated: Jun 26, 2022, 08:58 AM IST
Pandharpur wari 2022: संत सोपानकाका यांची पालखी निघाली पंढरीकडे title=

विशाल सवणे, सासवड : संत सोपान काका यांच्या पालखीचं काल प्रस्थान झालं. दुपारी दीडच्या सुमारास पालखी देऊळ वाड्यातून मंदिर प्रदक्षिणा करून बाहेर आली. कऱ्हा नदीच्या तीरावर वसलेलं सासवड हे गाव संपूर्ण भक्तिभावानं नाहून निघालं होतं. ग्यानबा तुकाराम माऊली टाळ-मृदुंगाचा गजर आणि कीर्तनाचे सुमधूर स्वर कानांना तृप्त करत होते.

तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यांना पायी वारी सोहळा होत असल्यामुळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं चित्र दिसत होतं. कालच संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवड मुक्कामी आली. सासवड मुक्कामी माऊलींची पालखी येताच वारकऱ्यांनी माऊलींचे धाकले बंधू संत सोपानकाका यांच्या समाधीचे दर्शन घेतले. 

वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वर माऊलींना माऊली म्हणून संबोधतात तर संत सोपानदेवांना सोपान काका असं आपुलकीने आणि प्रेमाने संबोधले जाते. पालखीच्या प्रश्‍नाआधी सर्व मानाच्या दिंड्यांना देऊळवाड्यात सन्मानित करण्यात आलं. यावेळी मंदिर संस्थानकडून वीणेकऱ्यांना पुष्पहार श्रीफळ आणि विठ्ठल रुक्माई ची मूर्ती देण्यात आली.

संत सोपान काकांची पालखी देऊळ वाड्यातून बाहेर येतात ज्ञानेश्वर माऊलींच्या नावाचा जयघोष झाला तर फुलांच्या वर्षावात संत सोपानकाकांच्या नावाचा ही जयघोष करण्यात आला. भाविकांनी पालखी खांद्यावर गावात आणली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा हजारो सासवडकर यांनी गर्दी केली होती वारकऱ्यांच्या चरणावरती सासवडकर माथा टेकत होते. 

वारकऱ्यांवर फुलांची उधळण करत होते. संत सोपान काका यांच्या पादुकांना स्पर्श करण्यासाठी सासवडकर यांनी गर्दी केली होती. हा सगळा सोहळा "याची देहा याची डोळा" पाहण्याचा योग तब्बल दोन वर्षांनंतर आला होता. सोपानकाका पंढरीच्या दिशेने रवाना झाले. संत सोपान काका यांच्या पालखीचा पहिला मुक्काम हा पांगिरे गावात असणार आहे