ठाकरेंच्या मशालीपाठोपाठ 'ढाल-तलवार'ही कोर्टात?

शिंदे गटाला देण्यात आलेल्या ढाल तलवार निशाणीवरूनही नवा वाद सुरू झालाय.

Updated: Oct 15, 2022, 11:56 PM IST
ठाकरेंच्या मशालीपाठोपाठ 'ढाल-तलवार'ही कोर्टात? title=

सतीश मोहिते आणि विशाल करोळे, झी मीडिया : उद्धव ठाकरे (Uddhav Thakceray) गटापाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) गटाच्या निवडणूक चिन्हावरूनही नवा वाद सुरू झालाय. शिंदे गटाच्या ढाल तलवार निशाणीला शीख समाजानं आक्षेप घेतलाय. काय आहेत त्याची कारणं, पाहूयात हा रिपोर्ट. (objection from sikh community to eknath shinde group shield symbol)
 
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाचा निवडणूक चिन्हाचा वाद संपता संपत नाहीय. ठाकरे गटाला दिलेल्या मशाल निशाणीविरोधात समता पार्टीन कोर्टात आव्हान दिलंय. तर शिंदे गटाला देण्यात आलेल्या ढाल तलवार निशाणीवरूनही नवा वाद सुरू झालाय. नांदेडच्या शीख समाजानं ढाल तलवारीवर आक्षेप घेतलाय.

'ढाल तलवारी'ला आक्षेप का?

'त्रिशूळ' हे धार्मिक चिन्ह असल्यानं ठाकरे आणि शिंदे गटाला ते नाकारण्यात आलं. 'ढाल तलवार' हे शिखांच्या खालसा पंथाचं धार्मिक प्रतीक असल्याचा दावा सचखंड गुरुद्वारा बोर्डानं केलाय.श्री गुरू गोबिंदसिंह यांनी खालसा धर्माची स्थापना केली, तेव्हा ढाल तलवार रक्षणासाठी अर्पण केली. शिखांच्या पाचही तख्तांवर दररोज ढाल तलवारीची पूजा होते. त्यामुळं हे चिन्ह निवडणूक आयोगानं कोणत्याही राजकीय पक्षाला देऊ नये, असा आक्षेप शिखांनी घेतलाय. एवढंच नव्हे तर 'ढाल तलवार' निशाणी रद्द झाली नाही तर कोर्टात धाव घेण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.

दरम्यान, शीख समुदायाचं ढाल तलवार नाही, तर खंडा आणि कृपाण हे धार्मिक चिन्ह असल्याचा दावा ठाण्यातील शीख समुदायानं केलाय.याबाबत कुणाचा आक्षेप असेल तर निवडणूक आयोग उत्तर देईल, अशी भूमिका शिंदे गटानं घेतलीय. केंद्रीय निवडणूक आयोग या वादात आता काय भूमिका घेतंय, याची प्रतीक्षा सगळ्यांना आहे. ठाकरे गटापाठोपाठ आता शिंदे गटालाही निवडणूक चिन्हासाठी कायदेशीर लढाई लढावी लागणार, एवढं मात्र निश्चित.