माढा राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या जवळ, मुख्यमंत्री भेटीची चर्चा

माढा लोकसभेचे राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार संजय शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

Updated: Aug 16, 2019, 02:08 PM IST
माढा राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या जवळ, मुख्यमंत्री भेटीची चर्चा title=

सोलापूर : जिल्ह्यातील माढा राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे आणि त्यांचे बंधू माढा लोकसभेचे राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार संजय शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पूरग्रस्तांसाठीचा निधी त्यांच्याकडे सुपूर्द केला. मात्र याआडून आगामी विधानसभा निवडणुकीत माढा आणि करमाळा मतदारसंघातून शिंदे बंधू भाजपच्या जवळ असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत: पूरग्रस्तांसाठी सांगली-कोल्हापूरमध्ये तळ ठोकून असताना शिंदे बंधूंनी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन मदत निधी देण्याचा मार्ग स्वीकारल्याने शिंदे बंधूंची विधानसभेची पूर्वतयारी असल्याचे बोलले जात आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या संभाव्य मुलाखती राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्या होत्या, यावेळी सुध्दा शिंदे बंधूंनी मुलाखतीस जाणे टाळले होते. अशातच आता मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधल्याने सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप होईल का, याची चर्चा सुरू झाली आहे.