अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री! शरद पवारांनी अखेर स्पष्टच सांगितलं, म्हणाले "हा वेडेपणा..."

Sharad Pawar on Ajit Pawar: राज्यभरात सध्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावाची चर्चा सुरु असून महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 26, 2023, 01:16 PM IST
अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री! शरद पवारांनी अखेर स्पष्टच सांगितलं, म्हणाले "हा वेडेपणा..." title=

Sharad Pawar on Ajit Pawar: राज्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. अजित पवार बंडखोरी करणार असल्यापासून ते त्यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शरद पवारांकडे (Sharad Pawar) दिल्याच्या चर्चांमुळे ते सध्या केंद्रस्थानी आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर स्पष्टपणे भाष्य केलं आहे. ते मुंबईत बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारच भावी मुख्यमंत्री असल्याचं दाखवण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुणे, धाराशीवनंतर राजधानी मुंबईतही अजित पवारांचे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावर शरद पवारांना विचारण्यात आलं असता, हा वेडेपणा करु नका असं अजित पवारांनीच सांगितलं आहे असं सांगत चर्चांना पूर्णविराम दिला. 

"अजित पवार यांनीच यावर नाराजी जाहीर केली आहे. असा वेडेपणा करु नका असं ते म्हणाले आहेत," असं शरद पवारांनी सांगितलं. 

दरम्यान उद्धव ठाकरेंनी आगामी काळात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल असा प्रस्ताव दिल्याचीही चर्चा होती. शरद पवारांनी हा दावाही फेटाळला आहे. उद्धव ठाकरेंकडून असा कोणताही प्रस्ताव दिलेली नाही असं ते म्हणाले आहेत.

मुंबईत लावण्यात आलेल्या होर्डिंग्सवर अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत खारघऱ दुर्घटनेचाही उल्लेख करण्यात आला आहे. जर अजित पवार मुख्यमंत्री असते तर खारघरमधील दुर्घटनेप्रकरणी तात्काळ कारवाई झाली असती असं त्यावर लिहिण्यात आलं आहे. 

याशिवाय उपराजधानी नागपुरातील लक्ष्मी भुवन चौकात राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनीही भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचं पोस्टर लावलं आहे. ''वचनाचा पक्का हुकूमाचा एक्का मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादा पक्का'' अशा आशयाचा हे होर्डिंग लावलं आहे. 

अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं विधान केल्यानंतर हे होर्डिंग लागू लागले आहेत. अजित पवार यांनी मात्र यावर अधिकृतपणे भूमिका मांडलेली नाही. त्यांनी या चर्चा फेटाळल्या आहेत. दरम्यान त्यांनी बंडखोरीचे दावेही फेटाळून लावले आहेत. आपण शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादी पक्षासोबत राहणार असल्याचं ते म्हणाले आहेत. मात्र त्यानंतरही दबक्या आवाजात अजित पवारांच्या चर्चा सुरु आहेत.