चंद्रकांत पाटील यांच्यावर करमणूक कर लावावा, रुपाली चाकणकर यांची मागणी

देवेंद्र फडणवीस दबंग नेते, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं

Updated: Sep 20, 2021, 05:19 PM IST
चंद्रकांत पाटील यांच्यावर करमणूक कर लावावा, रुपाली चाकणकर यांची मागणी title=

पुणे : राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यात आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या एका वक्तव्याने नवी चर्चा सुरु झाली आहे.

'देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीस यांच्या वयावर जाऊ नका', असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. किरीट सोमय्या प्रकरणावरून आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेनंतर ते बोलत होते.  महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना मी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला होता की राष्ट्रवादीकडे गृहखातं देऊ नका, असंही चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले.

रुपाली चाकणकर यांनी उडवली खिल्ली

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी खिल्ली उडवली आहे. चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्न आहे कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्याला निखळ मनोरंजन होत आहे. महाराष्ट्राचे वित्तमंत्री म्हणून अजित दादांना माझी विनंती आहे की त्यांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा. भाजप सरकार महाराष्ट्राचे हक्काचे GST चे पैसे देत नाही निदान यांच्यावरील करमणूक करामुळे सरकारचा काही भार तरी हलका होईल, असं ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.