राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांचा भाजपमध्ये प्रवेश

भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत ढोबळेंच्या अधिकृत प्रवेशाची घोषणा

Updated: Jan 28, 2019, 05:18 PM IST
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांचा भाजपमध्ये प्रवेश title=

जालना : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. जालन्यात सुरू असलेल्या भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत ढोबळेंच्या अधिकृत प्रवेशाची घोषणा करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर लोकसभेचं तिकीट त्यांना मिळणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. याआधी त्यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली होती.

आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातून लक्ष्मण ढोबळे यांना उमेदवारी मिळू शकते. याआधी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर मतदारसंघावर सध्या भाजपचं वर्चस्व आहे. 1951 ते 2014 या कालावधीत एका पोटनिवडणुकीसह झालेल्या 17 निवडणुकांमध्ये 12 वेळा या मतदार संघातून काँग्रेसचे खासदार निवडून आले आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. मोदी लाटेत भाजपचे शरद बनसोडे यांचा विजय झाला होता.