NCP Crisis in Maharashtra : आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांना मोठा झटका बसला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचं चिन्ह घड्याळ हे अजित पवार गटाला बहाल करण्यात आल आहे. शिवसेनापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचाही निकाल आयोगाने निवडणूकपूर्वीच लावला आहे. या निकालासाठी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा दाखला देण्यात आला होता. (NCP Crisis in Maharashtra NCP disqualified MLAs case result on 14 February Possibility of separate decision from Shiv Sena result Ajit Pawar Sharad Pawar)
लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात पुन्हा एकदा आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा पुन्हा पेटण्याची चिन्ह आहे. शिवसेना अपात्र आमदारानंतर आता राष्ट्रवादी आमदारांचं भवितव्य लवकरच लागणार आहे. येत्या 14 फेबुवारीला या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यादिवशी खऱ्या अर्थाने अजित पवार गट आणि शरद पवार गट यांचं भवितव्य ठरणार आहे. शिवसेना निकालाहून वेगळा निर्णय लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली असून आज त्यांना चिन्हाबाबत कळवायला सांगितलं आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आज शरद पवार गटाची पुण्यात बैठक होणार आहे. संध्याकाळी 4 वाजता ही बैठक होणार आहे. बैठकीला शहरातील शरद पवार गटातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. निकालानंतर पुढील दिशा काय असणार यावर बैठकीत चर्चा होणार आहे. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. ज्या पक्षाला त्यांनी घाम गाळून आपल्या मुलासारखं सांभाळत मोठं केलं त्या पक्ष आणि घडाळ्याबद्दल शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पवार गटाकडून आज पक्षाचं नवं नाव आणि चिन्ह सूचवलं जाणार आहे. शरद पवार गट उगवता सूर्य हे चिन्ह घेण्याची शक्यता आहे. झी 24 तासला सूत्रांनी ही माहिती दिलीय. हे चिन्ह घेऊन पवार गट राज्यात पुन्हा नव्याने आपला श्रीगणेशा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार गट आज पक्षाचे काय नाव निवडणूक आयोगाला देतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.