Sharad Pawar Announcement : शरद पवार यांनी भाकरी फिरवली, काय होती अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया?

Sharad Pawar Announcement : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देशाच्या राजकारणातील चाणक्य म्हटलं जातं. अशा या पवारांनी अतिशय महत्त्वाची घोषणा करत प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली

सायली पाटील | Updated: Jun 10, 2023, 02:16 PM IST
Sharad Pawar Announcement : शरद पवार यांनी भाकरी फिरवली, काय होती अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया?  title=
ncp chief sharad pawar make big announcement elect supriya sule praful patel as working president

Sharad Pawar Announcement : राज्याच्या राजकारणात दर दिवशी नवनवीन घडामोडी घडत असतानाच मुरब्बी राजकारणी शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच भाकरी फिरवण्यासंदर्भातील वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतरही बरंच राजकारण रंगलं, सरतेशेवटी कार्यकर्ते आणि पक्षातील नेत्यांच्या आग्रहास्तव शरद पवार यांनी राजीमाना मागे घेतला. पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापन दिनाला शेवटी त्यांनी एक मोठी घोषणा केली आणि क्षणात भाकरी फिरवली. 

शनिवारी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त दिल्लीतून कार्यकर्ते आणि नेतेमंडळींना संबोधताना पवारांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. याचवेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी आपल्या कन्या सुप्रिया सुळे आणि पक्षातील अनुभवी नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाच्या वतीनं पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुकांची जबाबदारी सोपवत असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

नेतेमंडळींना सोपवल्या मोठ्या जबाबदाऱ्या...

सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्रातील निवडणुकांची जबाबदारी सोपवलेली असतानाच दुसरीकडे पवारांनी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्य प्रदेश, गुजरात, गोवा आणि झारखंड या राज्यांची जबबादारी सोपवली. पक्षातील अनुभवी नेते, सुनील तटकरे यांना पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी सचिव ही जबाबदारी दिली. तर, जितेंद्र आव्हाड यांना पक्षाच्या वतीनं बिहार, कर्नाटक आणि छत्तीसगढ या राज्यांची जबाबजारी सोपवली. 

हेसुद्धा पाहा : भाजपच्या कार्यक्रमादरम्यान मंडप कोसळला; नितेश राणे थोडक्यात बचावले

तिथे प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर पक्षाची मोठी आणि तितकीच महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलेली असताना इथे अजित पवार यांच्याकडे मात्र कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. दरम्यान त्यांच्याच प्रतिक्रियेकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलेलं असताना ते कार्यक्रम स्थळावरून काहीही न बोलताच निघून गेल्याचं पाहायला मिळालं. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठकही पार पडली. पण, अजित पवार मात्र या बैठकीला हजर नव्हते. 

अजित पवार यांची ही कृती पाहता आता राष्ट्रवादीत नव्यानं नाराजी नाट्याला सुरुवात होणार का? हाच प्रश्न उपस्थित होत आहे. बरं, हे नाराजीनाट्य सुरु झाल्यास त्यावर शरद पवार कोणता तोडगा काढतील हे पाहणंही महत्वाचं ठरेल.