'मला कुणी तरी थांबवायला हवं होतं!' पवारांना 45 वर्षांपूर्वी केलेल्या चुकीबद्दल आजही खंत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 84 वा वाढदिवस आहे. शरद पवार हे नव्या पिढीतील राजकारण्यासांठी मोठं उदाहरण आहेत. याचं कारण शरद पवारांनी राजकारणासह आपल्या खासगी आयुष्यात अनेक अडचणींवर मात केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 12, 2023, 12:09 PM IST
'मला कुणी तरी थांबवायला हवं होतं!' पवारांना 45 वर्षांपूर्वी केलेल्या चुकीबद्दल आजही खंत title=

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 84 वा वाढदिवस आहे. सर्वच क्षेत्रातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. सध्या पक्षफुटीचा सामना करत असलेल्या शरद पवारांना फक्त राजकारणच नाही तर खासगी आयुष्यातही अनेक अडचणींचा सामना करावा लागला असून, त्यावर त्यांनी यशस्वीपणे मात केली आहे. त्यातील एक सर्वात मोठी चूक म्हणजे गुटख्याचं सेवन होतं. शरद पवारांनी एका मुलाखतीत आपल्याला हे व्यसन नेमकं कसं लागलं आणि त्यासाठी किती मोठी किंमत चुकवावी लागली याबद्दल खुलासा केला होता. 

गुटख्याचं सेवन केल्याने शऱद पवारांना तोंडाचा कॅन्सर झाला होता. यानंतर डॉक्टरांनी त्यांना तुमच्याकडे फक्त 6 महिने आहेत असं सांगितलं होतं. पण शरद पवारांनी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात केली होती. यानंतर त्यांनी जनतेत जाऊनही जनतेला तंबाखूचं सेवन न करण्याचं आवाहन केलं होतं. 

शरद पवारांनी 8 वर्षांपूर्वी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या गुटख्याच्या व्यसनाबद्दल सांगितलं होतं. "मी मोठी किंमत चुकवली आहे. मी फार वर्षं गुटखा खात होतो. माझ्या घरात कोणीही गुटखा सेवन करत नव्हतं. पण मी सार्वजनिक आयुष्यात असताना एका गावात मला चहानंतर गुटखा दिला होता. त्यांनी आग्रह केल्याने मी सेवन केलं आणि नंतर सवयीचा भाग झाला," असा खुलासा शरद पवारांनी केला होता.  

पुढे ते म्हणाले होते की, "मला त्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागली होती. मला कॅन्सर झाला होता. मला सर्व दात काढावे लागले होते. तीन वेळा माझी सर्जरी झाली होती. माझ्याकडे 6 महिन्यांचा वेळ आहे असं सांगण्यात आलं होतं. पण प्रचंड इच्छाशक्ती आणि सर्जरी झाल्यानंतर माझी यातून सुटका झाली". 

"तोंडाचं ऑपरेशन करण्यात आल्याने माझ्या आवाजात फरक पडला. सार्वजनिक आयुष्यात तुम्हाला नेहमी भाषणं करावी लागतात. माझ्या भाषणांवर याचा परिणाम झाला होता. पण मी गुटखा सोडल्यानंतर परत त्याला हात लावला नाही. त्यातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या सत्तेतील सहकाऱ्यांना याबद्दल सांगितलं होतं. महाराष्ट्र सरकारने त्यावेळी विधानसभेत कायदा करत गुटख्यावर बंदी आणली," असं शरद पवार म्हणाले होते. 

गुटख्याने कॅन्सर होत नाही असं म्हणणाऱ्यांसाठी मी उदाहरण आहे. मी टाटा हॉस्पिटलमघ्ये जातो तेव्हा 50 टक्के रुग्ण तंबाखू, गुटख्यामुळे कॅन्सर झालेले असतात. सिगारेट, बिडी, तंबाखू, गुटखा या सर्वांसाठी एकच किंमत मोजावी लागते. यातून गरिबांना रोजगार मिळतो हाच एकमेव सकारात्मक मुद्दा आहे असं शरद पवारांनी सांगितलं होतं.