विशेष अधिवेशनादरम्यान अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये जुगलबंदी रंगली. संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला होता. सभागृहात अजितदादा आणि जयंत पाटलांमध्ये रंगलेली जुगलबंदी कशी होती, पाहुयात.
विधानसभेच्या अधिवेशनात गंभीर मुद्यांवर जशी चर्चा होत असते. तसेच काही हलकेफुलके क्षणही पाहायला मिळत असतात. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये सभागृहातच जुगलबंदी रंगली. आपल्या खुमासदार शैलीतल्या भाषणासाठी जयंत पाटील ओळखले जातात. तर बेधडक वक्तव्यांसाठी अजितदादा प्रसिद्ध आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर अनेकांची भाषणं झाली. अजितदादांच्या भाषणानंतर जयंत पाटील भाषणाला उभे राहिले. आणि सुरू झाली दादा आणि पाटलांमधली जुगलबंदी.
जयंत पाटील भाषणात एक जुना किस्सा सांगत होते. बोलताना जयंत पाटलांनी स्वत:चा उल्लेख आमदाराऐवजी अध्यक्ष असा केला. नेमकं इथंच अजितदादांनी पाटलांना कात्रीत पकडलं आणि त्यांची चूक दुरूस्त करून दिली. पण यानंतर शांत बसतील ते जयंत पाटील कसले. त्यांनी लगेच, अजितदादांचं आपल्यावर किती बारीक लक्ष आहे बघा, असा टोला लगावला.
आता जयंत पाटलांनी बॅटींग केल्यानंतर अजितदादांनी पुन्हा टोला लगावला. माझं लक्ष आहेच पण तुम्हीच प्रतिसाद देत नाही, असं म्हणत दादांनी पुन्हा पाटलांच्या कोर्टात चेंडू टोलवला. त्यावर जयंत पाटलांनीही तितक्याच मिश्कीलपणे अजितदादांना प्रत्युत्तर दिलं.
अजितदादा आणि जयंत पाटलांमध्ये रंगलेली जुगलबंदी संपूर्ण सभागृह बघत होतं. सर्व उपस्थित आमदारांनी या जुगलबंदीचा आस्वाद घेतला. कायम राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या वातावरणात हे हलकेफुलके क्षण अनेकांना हसवून गेले.