मुकुल कुलकर्णी, झी मिडिया नाशिक : महिलांचे आरोग्य जपण्यासाठी नाशिकच्या हॉटेल व्यवसायिकांनी पुढाकार घेतलाय. दिल्लीच्या धर्तीवर महापालिका हद्दीतील हॉटेल्समधील शौचालये महिलासाठी खुली केली जाणार आहेत. महिलांसाठी पुरेशा शौचालयांची उभारणी करण्यात महापालिका अपयशी ठरल्याने महिलांची कुचंबणा दूर करण्यासाठी हॉटेल असोसिएशन पुढे आलीय.
सरकारच्या माध्यामातून राईट टू पी उपक्रम राबवला जातोय. सव्वाशे कोटींच्या देशात महिलांसाठी पुरेशी शौचालये नसल्याने महिलांच्या आरोग्याचा प्रश्न समोर आलाय. त्याला नाशिक शहरही अपवाद नाही. नाशिक शहरात सार्वजनिक शौचालयांची संख्या अपुरी आहे. जी आहेत त्यांची अवस्थाही अत्यंत खराब आहे. १८ लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या नाशिक शहरात १०७ शौचालयं आहेत. तर सशुल्क स्वच्छतागृह साडे तीनशे ते चारशेच्या घरात आहेत. नाशिक तीर्थक्षेत्र असल्याने दरोरोज हजारोच्या संख्यने नागरिक नाशिकमध्ये येत असतात. शौचालयांच्या अपुऱ्या संख्येमुळे महिलांची कुचंबणा होते.
महिलांची ही कुचंबणा लक्षात घेऊन नाशिक शहरातील हॉटेल व्यवसायिकांनी सामाजिक भान ठेवत महिलांच्या वापरासाठी शौचालय खुली करण्याचा निर्णय घेतलाय. नाशिक महापालिका प्रशासनाला त्या संदर्भातील प्रस्ताव देण्यात आलाय.
सरकारी कार्यालय असो किंवा खाजगी कार्यालय अशा प्रत्येक ठिकाणी महिलांच्या शौचालायांची कमतरता जाणवते. मनपालाही त्यावर अजून तोडगा काढता आलेला नाही. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. याचा कित्ता अन्य शहरातही गिरवायला हवा...