पंतप्रधानांच्या ताफ्यातील SPG कमांडोचा दुर्दैवी मृत्यू; NDRF कडून शोध सुरु

Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना SPG अंतर्गत सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे एकमेव व्यक्तिमत्व आहेत, ज्यांची सुरक्षा व्यवस्था SPG कमांडोच्या हातात आहे. हे देशातील सर्वात विशेष सुरक्षा दल मानले जाते. मात्र नाशिकमध्ये एसपीजी कमांडोच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

Updated: Mar 10, 2023, 11:23 AM IST
पंतप्रधानांच्या ताफ्यातील SPG कमांडोचा दुर्दैवी मृत्यू; NDRF कडून शोध सुरु title=

चेतन कोळस, झी मीडिया, नाशिक : गुरुवारी झालेल्या एका दुर्दैवी अपघातने नाशिककर (Nashik News) हादरले आहेत. नाशिकच्या येवल्यामध्ये (Yeola) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या ताफ्यातील कमांडोच कालव्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गावी आलेल्या या कंमाडोचा (commando) अपघातात मृत्यू झाल्यानंतर गावावर शोककळा पसरली आहे. सुदैवाने या भीषण अपघातातून या कंमाडोचे कुटुंब वाचवले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील एसपीजी (SPG) कमांडो गणेश सुखदेव गीते हे सुट्टीनिमित्त आपल्या गावी सिन्नर तालुक्यातील मेंढी येथे आले होते. गुरुवारी सकाळी ते पत्नी रुपाली गीते आणि मुलगा व मुलीसह शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना गीते कुटंबियांसोबत मोठा अपघात झाला. या अपघातात एसपीजी कमांडो गणेश गीते यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या कुटुंबियांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे.

गीते कुटुंबिय नांदूरमधमेश्वर येथील उजवा कालव्यावरून घराकडे जात असताना गणेश गीते यांचा मोटरसायकलवरील ताबा सुटला. गीते यांचा मोटारसायकल थेट कालव्यात कोसळली. गणेश गीते यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि दोन्ही मुले पाण्यात पडली. पत्नी आणि मुलगा बाजूला पडल्याने त्यांना पटकन बाहेर काढण्यात आले. तर मुलगी आणि गणेश गीते हे पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जात होते. त्यावेळी एका स्थानिकाने पाण्यात उडी घेत दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र बचावकर्त्याला मुलीलाच वाचवता आले. पाण्याचा वेग जास्त असल्याने गणेश गीते यांचा मृत्यू झाला. एनडीआरएफचे पथक सध्या  त्यांचा शोध घेत आहे.

नेमकं काय घडलं?

"वेगात असलेल्या गाडीचा जोरदार आवाज आल्यानंतर शेळ्या घेऊन जाणाऱ्याने मला आवाज दिला आणि कोणीतरी पाटामध्ये पडल्याचे सांगितले. त्यावेळी पळत आलो तेव्हा पाहिले की गणेश गीते यांची पत्नी आणि मुलगा मधे पडलेली दिसली. त्यांना बाहेर काढल्यानंतर मोठी मुलगी आणि गणेश गीते पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहत जाताना दिसले. मी पाण्यात उडी मारल्यानंतर कोणाला वाचवायचा हा प्रश्न होता. मी मुलीला घट्ट पकडलं होतं. त्या मुलीला बाजूला आणून सोडलं. मुलीला किनाऱ्यावर आणताना गणेश गीते यांचा आणि माझा संपर्क तुटला आणि त्यानंतर ते दिसेनासे झाले," असे बचावासाठी गेलेल्या व्यक्तीने सांगितले.