हौस म्हणून घरचा टेम्पो चालवायच्या... नाशिकची गृहीणी अशी बनली ST बस ड्रायव्हर

गृहीणी ते एसटी ड्रायव्हर... नाशिकच्या या महिलेचा प्रवास अत्यंत थक्क करणारा आहे. नाशिकच्या या महिला ड्रायव्हरवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Jun 9, 2023, 05:02 PM IST
हौस म्हणून घरचा टेम्पो चालवायच्या... नाशिकची गृहीणी अशी बनली ST बस ड्रायव्हर  title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई :  जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी असं म्हणत तुकडोजी महाराज यांनी म्हटले आहे. राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई, सावित्रीबाई ते सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु ह्यांच्यापर्यंत शेकडो स्त्रियांनी विविध क्षेत्रात आजवर आपली कर्तबगारी दाखवली. चूल आणि मूल" यावर मर्यादित न राहता पाळण्याच्या दोरीसह, बसची बेलदोरी हाती धरत बस कंडक्टरची कामगिरी देखील सक्षमपणे पार पाडली. आता महिलांच्या हाती एसटी बसचे स्टेअरिंग आले आहे. नाशिकमधील महिला एसटी ड्रायव्हर सध्या चांगल्याच चर्चेत आहेत (MSRTC appoints women bus drivers). 

नाशिकमधील पहिल्या एसटी ड्रायव्हर 

माधवी संतोष साळवे (वय 34 वर्षे) या नाशिकमधील पहिल्या एसटी ड्रायव्हर  ठरल्या आहेत. एसटी महामंडळात महिला चालचांची नियुक्ती करण्यात आली आहे. माधवी यांची देखील एसटी ड्रायव्हर म्हणून नियक्ती झाली आहे.  खेड्यापाड्यात अवघड रस्त्यावर त्या अगदी सफाईदारपद्धतीने बस चावलत आहे.  

गृहीणे ते बस ड्रायव्हर 

गृहीणे ते बस ड्रायव्हर असा माधवी यांचा प्रवास आहे. नाशिक मधील धुडगाव येथे राहणाऱ्या माधवी या गृहीणी आहेत. माधवी यांना आधीपासूनच ड्रायव्हिंगची आवड आहे. हौस म्हणून घरचा टेम्पो चालवायच्या. त्यांना आता थेट एसटी महामंडळात ड्रायव्हरची नोकरी मिळली आहे. 

सन 2019 च्या भरती प्रक्रियेत 206 महिला चालक तथा वाहक या पदासाठी निवडल्या गेल्या. एसटी महामंडळाने स्वतःच्या खर्चाने त्यांना हेवी व्हेईकलचे एक वर्ष ट्रेनिंग दिले. पुढे त्यांनी एक वर्ष हेवी व्हेईकल चालवण्याचा सराव केला. जो एसटी चा चालक बनण्यासाठी आवश्यक आहे. त्यानंतर त्यांची रीतसर एसटी बसवर चाचणी घेऊन त्यांना प्रशिक्षण देऊन सेवेत  रुजू करून घेण्यात आले आहे.

कौतुकाचा वर्षाव

माधवी यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.  महिला सन्मान योजने अंतर्गत महिलांना तिकिटात 50 टक्के सवलत देऊन तेवढ्यावरच न थांबता राज्य परिवहन त्यांना पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी दिली आहे. एसटी महामंडळाच्या उपक्रमाची नागरिक प्रशंसा करत आहेत. महिला सक्षमीकरण्याच्या दिशेने हे आश्वासक पाऊल असल्याचेही बोलले जात आहे. सिन्नर आगारातील सर्व कर्मचारी तसेच नाशिक विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया माधवी यांनी दिली.