Nashik Husbands: घरगुती हिंसाचाराच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. यातील बऱ्याच घटनांममध्ये पतीकडून मारहाण झाल्याच्या तक्रारी असतात. हुंडा, संशय अशा अनेक कारणावरुन पती जाच, मारहाण करत असल्याच्या तक्रारी पीडित पत्नींकडून पोलिसांत दाखल होत असतात. यातील अनेक प्रकरणे कोर्टात पोहोचतात. अन्याय, अत्याचार करणाऱ्या पतीपासून सुटका व्हावी, न्याय मिळावा यासाठी पीडित पत्नी केस लढत असल्याचेही पाहिले असेल. पण नाशकात याविरुद्ध प्रकार घडतोय. येथे एक अनोखा मेळावा पार पडला. जिथे पत्नी पीडित पुरुषांचं संमेलन भरवण्यात आलं होतं. पत्नीच्या जाचाला कंटाळलेले पुरुष येथे एकत्र आले. त्यांनी आपली सुखदुख एकमेकांना सांगितली. एवढेच नव्हे तर आपल्या न्याय हक्कांसाठी सरकारकडे मागणीदेखील केली. काय आहे हे प्रकरण? जाणून घेऊया.
पत्नी पीडित पुरुषांनी एकत्र येऊन आपल्या समस्या मांडल्या. आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी करण्यासाठी ते नाशिकच्या एका खासगी रिसॉर्टमध्ये जमले होते. आपल्या पत्नीपासून सुटका करून घेण्यासाठी यांची चर्चा सुरु होती. लग्न झाल्यानंतर पत्नीच्या जाचानं हैराण झालेले हे पती आहेत. घटस्फोट देणं तर दूरच मात्र विविध पोलीस तक्रारी आणि आरोप करत त्यांनी समाजामध्ये जगणं असह्य करून ठेवलंय. अशा सर्व पतींनी आज एकमेकांची सुखदुःख शेअर करण्यासाठी एकत्रितपणे मेळावा घेतला. वाढत्या घटना पाहून सरकारनं एक समिती स्थापन करून चौकशी करावी, आम्हाला न्याय मिळावा, अशा मागण्या करण्यात आल्यात.
महिला पोलिस स्टेशन आणि कोर्टात होणारा छळ या ठिकाणी चर्चिला गेला. कायद्याच्या किचकट बाबी समजावून सांगितल्या गेला. पत्नीच्या मानसिक त्रासामुळे अनेक पती आत्महत्येसारखं पाऊल उचलतात, त्यामुळे अशा पतींचं मानसिक प्रबोधन आणि पाठिंब्यासाठी उपाययोजनांविषयी चर्चा करण्यात आल्यात.
समाजात महिलांचे होणारे शोषण बघता महिलांना कायद्यानं विशेष अधिकार देण्यात आले. याचा वापर करत महिलांनी केलेल्या तक्रारीमुळे अनेक वेळेस गंभीर समस्या उभ्या राहू शकतात. याचाच फायदा घेत सर्व पतीराजांना आता अडचणीत आणण्याचं काम केले जातंय. परिणामी या कायद्याचा होणारा दुरुपयोग किमान पती-पत्नीमध्ये थांबावा, अशी मागणी आता होत आहे.
संसार म्हटलं की वादविवाद आलेच. पण हे वाद विवाद वेळेत, सामोपचाराने मिटवता आले नाहीत तर हे खूप पुढे जातात. यात पोलीस, कोर्टाला हस्तक्षेप करावा लागतो. एकदा कायद्याच्या कचाट्यात अडकलात की निकाल लागण्यास वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. त्यामुळे दोघांनाही मनस्तापाला सामोरे जावे लागते. अनेक गंभीर प्रकरणात कोर्टाची पायरी चढणेदेखील महत्वाचे असते. तर काही किरकोळ भांडणे चर्चा, सामंजस्यातूनही सोडवता येतात. कोणते पती-पती त्यांच्या प्रश्नाकडे कसे पाहतात हे महत्वाचे ठरते.