मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : नाशिक महापालिका शहरात अडीचशे कोटी रुपयांची रस्त्यांची कामं करणार आहे. मात्र, या कामांवरुन प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आहे. कारण, शहरातले चांगले रस्ते फोडून त्यांचावरच काँक्रिटीकरणाचा घाट घातला जातोय. प्रशासनाच्या या उधळपट्टीवर सत्तधारी भाजपच्याच नगरसेवकानं आक्षेप घेतलाय.
नाशिक महापालिकेत महासभेच्या पटलावर विषय न ठेवता मागच्या दारानं जादा विषयांत नाशिक शहरात २५७ कोटी रुपयांचे रस्ते बांधण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे चांगले डांबरी रस्ते फोडून त्याजागी सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनवण्याचा घाट यातून घातला जात आहे.
नाशिकच्या पेठरोडचा हा रस्ता त्यापैकीच एक. एकही खड्डा नसलेल्या या रस्त्याची कुंभमेळा काळात दोन वर्षांपूर्वीच डागडुजी केली गेली होती. स्थानिक भाजप नगरसेवक कमलेश बोडके यांनी त्याला विरोध केलाय.
रस्त्याची कामं करण्याआधी विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने महापालिका अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण केल्याचा आरोप स्थानिक नगरसेवकांनी केलाय. तर महापौर रंजना भानसी यांनी आपल्याच पक्षाच्या नगरसेवकाचे हे आरोप धुडकावून लावताना, प्रत्येक नगरसेवकाला विचारुनच रस्ते निवडण्यात आल्याचा दावा केलाय.
नाशिक महापालिका तिजोरीत खडखडाट असताना प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रभागात कोट्यवधी रुपयाची कामं प्रस्तावित आहेत. तर दुसरीकडे पालिका तिजोरीत पैसे नसल्यानं इतर विकासकामांना ब्रेक लावण्याचं फर्मान लेखा विभागानं काढलंय. त्यामुळे पालिकेचा आर्थिक डोलारा कसा सांभाळला जाणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.