परदेशी पक्षांचा नांदूरमाध्यमेश्वरी किलबिलाट,

गोदावरी दारणेच्या संगमावर दरवर्षी भरतो मेळा, गुलाबी थंडीचा घेतायत आनंद

Updated: Jan 10, 2022, 04:48 PM IST
परदेशी पक्षांचा नांदूरमाध्यमेश्वरी किलबिलाट,  title=
नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात आढळणारे पक्षी

सोनू भिडे नाशिक:- नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर या पक्षी अभयारण्यात सध्या देश-विदेशातील पक्ष्यांचे हिवाळी संमेलन भरले आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरातून अनेक पक्षीनिरीक्षक सध्या येथे मुक्कामी आहेत महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख असलेल्या नांदूर मध्यमेश्वरला “रामसर”चा दर्जा मिळाला आहे. यामुळे नांदूर मध्यमेश्वर हे महाराष्ट्रातील एकमेव “रामसर” दर्जा मिळालेलं अभयारण्य झाल आहे.

नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात गोदावरी नदी आणि कादवा नदीचा संगम आहे. या संगमावर इ.स. १९११ ला दगडी बंधारा तयार आला होता. बंधारा बांधल्याने जलाशय निर्माण झाले होते. या १००.१२ चौरस किलो मीटर क्षेत्रात पसरलेल्या जलाशयाला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला होता.

भारतातील २६ अभयारण्याचा समावेश रामसर मध्ये झाला आहे. त्यात महाराष्ट्रातील नांदूर मध्यमेश्वर एक आहे. या अभयारण्यात स्थलांतरित देशी विदेशी पक्षांच्या २६५ प्रजातींची नोंद करण्यात आलीय. तर रामसर मध्ये आढळणाऱ्या १४८ पैकी ८८ स्थलांतरित पक्षांची नोद नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात करण्यात आली आहे.

जगप्रसिध्द पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांनी इ.स. १९८२ साली नांदूर मध्यमेश्वरला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी या अभयारण्याला भरतपूर म्हणून घोषित करावे अशी विनंती केली होती. यानंतर महाराष्ट्र राज्याने नांदूर मध्यमेश्वर ला भरतपूर म्हणून घोषित केले. 

या अभयारण्यात मोठे जंगल आणि माळरान परिसर आहे. या परिसरात ४०० हून अधिक प्रकारच्या वनस्पती येथे बघायला मिळतात. परिसरातील वेगवेगळ्या पाणथळ, पाणवनस्पती आणि परिसरातील वातावरण देशी- विदेशी पक्ष्यांना पोषक असल्याने नोव्हेबर ते जानेवारी महिन्यात पक्ष्यांची मांदियाळी बघायला मिळते. हि मांदियाळी अनुभवण्यासाठी पर्यटक सध्या नांदूर मध्यमेश्वरला पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. 

या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात स्थानिक आणी स्थलांतरित पक्षी बघायला मिळतात. अभयारण्यातील २३० प्रजातींच्या पक्षांपैकी ८० प्रवासी प्रजातीचे पक्षी दिसून येतात. या अभयारण्यात दर वर्षी यूरोप, सायबेरिया, उत्तर अमेरिका आणि आशियाई देशांतून पक्षी स्थलांतरित होत असतात. देशी आणि विदेशी सर्वाधिक ३५००० पक्षांची नोद स्थलांतराच्या काळात करण्यात आली आहे. 

स्थानिक पक्षांमध्ये विविध पक्षांचे दर्शन होते. त्यामध्ये पाणकावळा, खंड्या, बगळे, मुग्धबलाक, जांभळी,  चित्रबलक, पाणकोंबडी, राखी बगळा, असे पक्षी आढळतात.

स्थलांतरित पक्षांमध्ये रुडी शेल डक, गडवाल, मार्श आणि  मॉन्टेग्यू हॅरियर, ब्लू थ्रोट, ब्लू चिक बी ईटर, गोल्डन फ्लॉवर दिसून येतेत तर स्थानिक स्थलांतरीत पक्षात  उघड्या चोचीचा बगळा, राखी बगळा, जांभळा बगळा, स्पॉट बिल डक, स्पूनबिल, कमळपक्षी, रिव्हीर टर्न, शेकाटया, नदीसुरय आदी पक्षी आढळून येतात.

पक्षी निरीक्षणासाठी येथे निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत. अभयारण्य  व्यवस्थापनेकडून दुर्बीण, गाईड दिला जातो. पाणथळ्यात जाऊन पक्षी निरीक्षणासाठी प्याडल बोट उपलब्ध करून दिली जाते. मात्र पक्षी जलाशयात विहार करत असल्यास ही बोट उपलब्ध नसते.

पक्षी निरीक्षणासाठी डिसेंबर ते फेब्रुवारी हा उत्तम कालावधी असतो. हे पक्षी अभयारण्य पश्चिम महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात येत. नाशिक पासून अवघ्या४० किलोमीटरवर हे अभयारण्य आहे.  येथे येण्यासाठी वाहतुकीचे सर्व पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही पक्षीप्रेमी असाल तर या अभयारण्याला नक्की भेट द्या.