मोहाडी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिलेले भाजपचे बंडखोर आमदार नाना पटोले यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. नाना पटोले यांनी जनतेच्या विश्वासाचा खून केला आहे. त्यामुळे आज ही लोकसभा पोटनिवडणूक भंडारा गोंदिया येथील जनतेवर लादण्यात आली, अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. पटोले यांनी स्वार्थ तसेच अहंकारातून राजीनामा दिला आहे, असा आरोप करत जनतेवर निवडणूक लादायचीच होती तर स्वतः का लढले नाहीत, असा सवाल देखील मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.
येत्या २८ मे रोजी भंडारा गोंदिया जिल्ह्यात पोटनिवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजप तर्फे ज्येष्ठ नेत्यांचा सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. भाजपकडून मोहाडी तालुक्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपचे उमदेवार हेमंत पटले यांचा प्रचार सभा दरम्यान ते सभेला संबोधित करीत होते तर येत्या दोन दिवसात ये ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा देखील होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर पुन्हा एकदा आपलाच झेंडा फडकविण्यासाठी मुख्यमंत्र्यांसहीत भाजपचे नेते एकवटले आहेत. पण, त्याला विरोधी पक्षांनीही जोरदार आव्हान दिले आहे. विरोधी पक्षांकडूनही स्टार प्रचारकांच्या फौजा मैदानात उतरवल्या जाऊ शकतात. त्यामुळे येन निवडणुकीचा तोंडावर जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे.