Nagpur Viral Video: यंदाच्या वर्षीचा उन्हाळा काहीसा उशिरानं सुरु झाला. कारण, फेब्रुवारीपासून सुरु झालेला अवकाळी पाऊस थेट मे महिन्याच्या मध्यापर्यंत बरसत होता. किंबहुना आताही बरसत आहे. पण, राज्याचे काही भाग वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. विदर्भ याला अपवाद ठरलेला नाही.
विदर्भातील उकाडा म्हटलं की अनेकांनाच विचारानं घाम फुटतो. कसे राहता राव तुम्ही? असा भाबडा प्रश्न बऱ्याचदा शहरातली मंडळी विदर्भवासियांना विचारताना दिसतात. याच विदर्भातील उन्हाळ्याचा एक वेगळाच आणि काहीसा अनपेक्षित पैलू नुकताच समोर आला आहे. जिथं प्रचंड तापमानामुळे चक्क चालत्या गाडीत अंड्यांमधून कोंबड्याची पिलं बाहेर यायला लागली. सोमवारी नागपूरहून भंडाऱ्याच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनात हा प्रकार घडला.
नवतपामुळे सध्या विदर्भात तापमान प्रचंड वाढलं आहे. किंबहुना गेले अनेक दिवस तापमान सतत 42 - 43 अंशांच्या वर आहे. ज्यामुळं नागरिकही हैराण झाले आहेत. शेतपिकं करपली आहेत, सकाळ- दुपारच्या वेळी घराबाहेर पडणारी माणंही हाताच्या बोटांवर मोजावीत इतकीच. बरं, या उन्हाच्या झळा इतक्या, की कोंबडीच्या अंड्यातून चालत्या गाडीतच पिलं बाहेर आली. सोशल मीडियावर याचा व्हिडीओही व्हायरल झाला.
मुळात अंड्यातून पिलं बाहेर येण्यासाठी उब मिळणं गरजेचं असतं. मात्र, वैदर्भीय तापमानामुळे अंडीला कोंबड्यांशिवायच तापमानातील ऊब मिळून पिल्ल बाहेर येत असल्याच्या घटना घडत आहेत. महत्वाचं म्हणजे अंड्यांना आद्रताही आवश्यक असते, ही कसरही इथं भरून निघतेय. कारण, अचानक येणाऱ्या पावसामुळे वातावरणातील आद्रताही वाढत असून अनेक अंड्यातून पिलं बाहेर येतायत.
विदर्भात जाणवणाऱ्या उकाड्यामुळं परिस्थिती इतकी भीषण वळणावर पोहोचली आहे, की इथं प्राणीमात्रांनाही आता तापमानाच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच समोर आलेल्या माहितीनुसार तिथं असणाऱ्या अभयारण्यांमध्ये प्राण्यांसाठी चक्क मांस आणि त्यांच्या आवडीच्या पदार्थांच्या आईस कँडी देण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. काही भागांमध्ये प्राण्यांना उन्हाच्या झळा कमी जाणवाव्यात यासाठी पाण्याच्या फवाऱ्यांचीही व्यवस्था करण्यात आल्याची माहिती यंत्रणांनी दिली होती.