Mumbai Rain: मुंबईसह उपनगरात रात्रभर जोरदार पाऊस पडत आहे यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यातच एक दुर्दैवी हृदयद्रावक घटना घडली आहे. चार महिन्याचं बाळ वाहून गेले आहे. ठाकुर्ली आणि कल्याणदरम्यान अंबरनाथ लोकल थांबली असताना ही दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे लोकल थांबली आणि आईच्या डोळ्यादेखल बाळ नाल्यात वाहून गेलं.
मुसळधार पावसामुळे अंबरनाथ लोकल दोन तास उभी असल्यानं बाळाची आई आणि काका खाली उतरून रेल्वे ट्रॅकवरून चालत होते. त्यावेळी हे चार महिन्यांचं बाळ काकाच्या हातातून सटकलं आणि वाहत्या नाल्यात पडलं. दुपारी 2 वाजून 55 मिनिटांनी ही दुर्दैवी घटना घडली. नाल्यात पडलेल्या बाळाचा शोध सुरू आहे. यामुळं त्या मातेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचा आक्रोश काळीज पिळवटून टाकत होता.
मध्य रेल्वे खोळंबल्याचा फटका एका आईला बसलाय. थांबलेल्या लोकलधून ट्रॅकवर उतरताना चार महिन्याचं बाळ हातातून निसटलं आणि थेट नाल्यात वाहून गेले. ठाकुर्ली आणि कल्याणदरम्यान अंबरनाथ लोकल थांबली असताना ही दुर्घटना घडली. या बाळाची आई भिवंडीला राहणारी आहे. ती, चार महिन्यांची तान्हुली मुलगी आणि आजोबा असे मुंबईत केईएम रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. तिथून परतत असताना लोकल सेवा ठप्प झाली. लोकल दोन तास उभी असल्यानं बाळाची आई आणि आजोबा खाली उतरून रेल्वे ट्रॅकवरून चालत होते. त्यावेळी हे चार महिन्यांचं बाळ आजोबांच्या हातातून निसटलं आणि वाहत्या नाल्यात पडलं. अर्पिता पोगूळ असं या चार महिन्यांच्या तान्हुलीचं नाव आहे. दुपारी 2 वाजून 55 मिनिटांनी ही दुर्दैवी घटना घडली. ही चिमुकली नाल्यात पडताच मातेनं हंबरडा फोडला. नाल्यात पडलेल्या बाळाचा अग्निशमन दल आणि कल्याण डोंबिवली महापालिकेचे आपात्कालीन विभागाचे कर्मचारी शोध घेतायत. मात्र नाल्याला पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने बाळ शोधण्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत.
कल्याण - डोंबिवलीच्या पुढे लोकल सेवा ठप्प झाली आहे. कल्याणहून कर्जत, कसा-याला जाणारी आणि कर्जत, कसा-याहून कल्याणला येणारी लोकल वाहतूकही पूर्णपणे ठप्प झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीला मोठा फटका बसलाय. गेल्या दोन तासांपासून मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला मोठा फटका बसला आहे.
मुंबई- पुणे किंवा पुणे-मुंबई ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. मुंबई-पुणे रेल्वेसेवा उद्यापर्यंत बंद राहणार आहे. मुंबई विभागात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मुंबई- पुणे आणि पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.
CSMT, भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर आणि ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी झाली आहे. रेल्वे स्थानकांवर हजारो प्रवासी खोळंबले आहेत. प्रवासी चिंताग्रस्त होवून लोकलची वाट पाहत आहेत. लोकल अनिश्चित कालावधीसाठी विलंबाने धावत आहेत. मध्ये रेल्वेची वाहतूक प्रचंड विस्कळीत झाली आहे. सीएसएमटी ते डोंबिवली अशीच वाहतूक सुरू आहे. डोंबिवलीच्या पुढे गाड्या जात नाहीत. तर डोंबिवली ते सीएसएमटी आणि सीएसएमटी ते डोंबिवली वाहतूक अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे. सकाळपासूनच ट्रेन्स रखडतायत. रेल्वे स्टेशन्सवर प्रवाशांची मोठी गर्दी झालीय. सकाळपासूनच प्रवाशांचे हाल होत आहेत.
कर्जत, अंबरनाथ आणि बदलापूरहून मुंबई आणि कर्जत दिशेने जाणारी लोकल अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. तशा प्रकारची उद्धघोषणा रेल्वे प्लॅटफॉर्मवर रेल्वे प्रशासनाच्या वतीने केली जाते आहे. सध्या मुंबईच्या दिशेने एकही लोकल सुटत नसल्याने रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे.