राज ठाकरे हाजीर हो! अजामीनपात्र अटक वॉरंटवर कोर्टात सुनावणी; काय आहे 16 वर्षे जुनं प्रकरण?

Raj Thackeray Non-Bailable Arrest Warrant:  राज ठाकरेंना निलंगा येथील दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते.आज त्यांच्यावर सुनावणी पार पडणार आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Sep 20, 2024, 10:38 AM IST
राज ठाकरे हाजीर हो! अजामीनपात्र अटक वॉरंटवर कोर्टात सुनावणी; काय आहे 16 वर्षे जुनं प्रकरण? title=
राज ठाकरेंच्या अजामीनपात्र अटक वॉरंटवर कोर्टात सुनावणी

Raj Thackeray Non-Bailable Arrest Warrant: लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना बिनशर्थ पाठींबा दिल्यानतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे. राज्यभरात मनसेचे 225 ते 230 उमेदवार उभे केले जाणार आहेत. मनसेकडून सध्या विधानसभेची जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान कोर्टात सुरु असलेले 16 वर्षे जुने प्रकरण मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पाठ सोडत नाही. राज ठाकरेंना निलंगा येथील दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते.आज त्यांच्यावर सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे निलंगा न्यायालयात राज ठाकरे आज हजर राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बसगाडीची जाळपोळ तोडफोड प्रकरण

यापूर्वी ही काही वर्षांपूर्वी ते याच प्रकरणी निलंगा न्यायालयात हजर झाले होते. 16 वर्षापूर्वी मनसे कार्यकर्त्यांकडून महामंडळाच्या बसगाडीची जाळपोळ तोडफोड प्रकरणी निलंगा पोलिस ठाण्यात आठ जणावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये राज ठाकरे यांचा समावेश होता.

काय आहे प्रकरण?

2008 मध्ये उदगीर मोडवरती महामंडळाच्या बसगाडीची जाळपोळ करण्यात आली होती. निलंगा येथील मनसे कार्यकर्त्यांनी महामंडळाच्या बसगाडीची जाळपोळ  केल्याचा ठपका ठेवण्यात आला. याप्रकरणी निलंगा पोलिस ठाण्यात 8 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये राज ठाकरे यांचादेखील समावेश होता. 

प्रकरण वर्ग करण्याची विनंती 

यापूर्वी निलंगा न्यायालयाने जामिन रद्द केल्याने त्यांना निलंगा येथील न्यायालयात हजर रहावे लागले होते. वकीलांनी राज ठाकरे यांना प्रत्येक तारखेला निलंगा न्यायालयात येणे शक्य नसल्याने हे प्रकरण वर्ग करण्याची विनंती केली होती. त्यावेळी त्यांना जामीनही दिला होता. 

तारखेला हजर राहात नसल्यामुळे अटक वॉरंट 

मात्र तारखेला हजर राहात नसल्यामुळे न्यायालयाने पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक वॉरंट जारी केले होते. या प्रकरणात या पुर्वी चार जणांना रितसर वकिलामार्फत जामीन मिळाला आहे. मात्र राज ठाकरे आणि मनसेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख अभय सोळुंके हे हजर राहत नसल्यामुळे त्यांना पुन्हा अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. 

आज निलंगा न्यायालयात सुनावणी 

त्यावर आज निलंगा न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. त्या सुनावणी दरम्यान राज ठाकरे हे निलंगा न्यायालयात हजर राहणार का? ते पाहावं लागणार आहे. त्यासोबतच न्यायालयाने राज ठाकरे यांच्यासोबत अभय सोळूंके यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.