Raigad Sea News: अनेक मत्स्यप्रेमींना नाराज करणारी एक बातमी समोर येत आहे. रायगडच्या समुद्रातून जिताडा, रावस, शेवंड या जातीची मासळी गायब होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळं मासेमारांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मत्स्य उत्पादन घटण्याचीही भिती व्यक्त करण्यात येत आहे. सर्वाधिक मागणी असणारे मासे समुद्रातून गायब झाल्याने मच्छिमारांवर आर्थिक संकट ओढावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
समुद्रात टाकण्यात येणारा भराव, समुद्रात सोडण्यात येणारे केमिकल व सांडपाणी याचा फटका मत्स उत्पादनांवर होताना दिसतोय. रायगड जिल्ह्यातही याचा परिणाम होताना दिसत आहे. जिताडा, रावस, शेवंड या मासळीला सर्वाधिक मागणी असते. खवय्यांमध्ये या माशांची मागणीदेखील अधिक असते. तसंच, या मासळीला भावही चांगला मिळतो. रायगड जिल्ह्यात वर्षाला सरासरी 42 हजार मेट्रिक टन मासेमारी करण्यात येते. मात्र, गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील मत्स्य उत्पादन घटत चालले आहे. सध्या 39 हजार मेट्रिक टन मत्स्य उत्पादन वर्षभरात घेतले जात आहे.
राज्याला 720 किमीला समुद्रकिनारा लाभला आहे. या किनाऱ्यावर मासळी मोठ्या प्रमाणात मिळते. कोकण किनारपट्टीही मासळीसाठी लोकप्रियदेखील आहे. रायगड जिल्ग्यातील 30 हजार कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. मात्र, समुद्रासोबत छेडछाड केल्यानंतर त्याचा परिणाम मस्त्य उत्पादनांवरही होताना दिसत आहे. त्यामुळं मच्छिमारांवर आर्थिक संकट ओढावू शकते.
मासळी बाजारात जास्त दर असलेल्या जिताडा, पाला, रावस, दाडा, ताम, वाम, शेवंड या जातीच्या मासळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. तर, एकीकडे जिल्ह्यात पापलेट, सुरमई, रावस, भाकस, कोलंबी, माकुल, मांदेली, बांगडा, बोंबिल या जातींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळं मच्छिमारांना थोडा दिलासा मिळाला आहे.
जिताडा हा मासा मासळीचा राजा म्हणून ओळखला जातो. रायगड जिल्ह्यातील जिताडा मासासमोर पापलेट आणि सूरमईदेखील फिके पडतील. राज्यातील अनेक मंत्र्यांनाही जिताडा माशाने भुरळ घातली आहे. असं म्हणायचे की जी कामे पैशाने होत नाही ती या जिताडा माशाने पूर्ण होतात. रायगडच्या किनारपट्टीवरच जिताडा माशाचे उत्पादन जास्त आढळते. पेण, पनवेल, अलिबाग येथ खाडीलगत या माशाचे उत्पन्न जास्त आहे. तळ्यातही याचे संवर्धन केले जाते.