'माझा मृतदेह सागर बंगल्यावर टाका'; जरांगे संतापले, फडणवीसांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil, Alligance On Deputy CM Devendra Fadanvis:  मला बदनाम करुन मला संपवायचा प्लान फडणवीसांचा असल्याचा आरोप जरांगेंनी केला.

Pravin Dabholkar | Updated: Feb 25, 2024, 02:16 PM IST
'माझा मृतदेह सागर बंगल्यावर टाका'; जरांगे संतापले, फडणवीसांवर हल्लाबोल title=
Manoj Jarange Patil, Alligance On Deputy CM Devendra Fadanvis

Manoj Jarange Patil, Alligance On Deputy CM Devendra Fadanvis: आंदोलन संपवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची माणसं आहेत.  हे सर्व देवेंद्र फडणवीस करत आहेत. त्यांच्याकडूनच आंदोलन संपवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय. माझा बळी हवा असेल तर मी सागर बंगल्यावर येतो. कारण मला बदनाम करण्याचं कटकारस्थान सुरु आहे.  फडणवीसांना माझा बळी हवाय असे जरांगे यावेळी म्हणाले. त्यांचं जे ऐकत नाहीत तो माणूस संपतो. एखादी जात मोठी झाली तर त्यांना जमत नाही. अशावेळी मला बदनाम करुन मला संपवायचा प्लान फडणवीसांचा असल्याचा आरोप जरांगेंनी केला. माझ्या बदनामीमागे फडणवीस, शिदेंची माणसं असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

हे राज्य देवेंद्र फडणवीस चालवतात. ना एकनाथ शिंदे चालवतात, ना अजित पवार चालवतात. फडणवीस म्हणले तर एका मिनिटात सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी होईल. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. फडणवीसांनी मला रोखून दाखवावं. मी मेल्यावर माझा मृतदेह सागर बंगल्यावर टाका, असे आवाहन जरांगेनी केलंय. फडणवीसांनी आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करु नये, असेही ते म्हणाले. आपण फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाणार असल्याचे ते म्हणाले. मी मराठा समाजाच्या बाजुने असलेलं फडणवीसांना नको

फडणवीसांनी प्रफुल्ल पटेल, भुजबळांनी शरद पवारांची साथ सोडली. पवार राष्ट्रवादी सोडू शकत नाहीत. भाजपला मोठं करणाऱ्या मुंडेंच्या मुलीची अवस्था वाईट करुन ठेवलीय. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात कटुता निर्माण केलीय. या सर्वामागे फडणवीसच असल्याचा जोरदार हल्लाबोल जरांगे पाटलांनी केला. 5 वर्षात सर्वांचे सरकार आले पण जनतेचं मात्र मरण झालं, असं जरांगे यावेळी म्हणाले. 

आरक्षणाचा सगळा खेळ सत्तेसाठी सुरु आहे. माझ्यावर केलेले आरोप सिद्ध केल्यास मी सांगेन ते करेन,असे त्यांनी सांगितले. बारस्कर हा बळीचा बकरा आहे. बारस्करांच्यामागेदेखील फडणवीसांचा हात आहे. खुमखुमी असेल तर फडणवीसांनी पुढे यावं. मीच आता सागर बंगल्यावर येतो. फडणवीस, तुम्हाला आयुष्यातून उठवेन, असे यावेळी ते म्हणाले. मराठ्यांनो आता सावध व्हा. लांबचा विचार करण्याची गरज आहे. 

ओबीसीतून आरक्षण मिळावं हीच आमची मागणी आहे. मला आमदार, मंत्री व्हायचं नाही. आंदोलनामुळे मला जास्त बोलता येत नाही. फोन नाही उचलले तर नाराज होऊ नका, असे आवाहन त्यांनी मराठा बांधवांना केलंय.