राज्यात पपुन्हा एकदा कडाक्याची थंडी पडली आहे. तर मुंबई, ठाण्यासह पुण्यातही धुक्याच वातावरण आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे पावसाची आज शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज अनेक भागात 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
भारताच्या दोन्ही बाजूला पश्चिम बंगालच्या खाडीत आणि अरबी समुद्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे. तीन सायक्लोनिक सर्क्युलेशनचा प्रभाव आहे. त्यामुळे दक्षिणेकडे पावसाचा अंदाज तर उत्तरेकडे पाऊस आणि हाडं गोठवणारी थंडी असं दोन्ही वातावरण पाहायला मिळेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
काही भागांमध्ये रिमझिम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे ज्यामध्ये उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांचा समावेश आहे. उर्वरित ठिकाणी कोणताही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला नाही. पुढच्या 48 तासात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रायगड, पालघरमध्ये रिमझिम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, नगरमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात चार दिवस पावसाची शक्यता आहे. किमान तापमानात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये कोकण किनारपट्टी क्षेत्रासह उत्तर महाराष्ट्राचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या अरबी समुद्राच्या आग्नेयेकडे चक्राकार वारे वाहत असल्यानं ही स्थिती उदभवल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात सध्या थंडीचा जोर वाढलाय. थंडीचा अनेकांना फटका बसतोय. अमरावतीमध्ये कडाक्याच्या थंडीतही तरूण तरूणी पोलीस भरतीचा सराव करताना पहायला मिळतायत.