Maharashtra Weather Update: राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळं महाराष्ट्रात गारठा कायम आहे. अनेक ठिकाणी पारा 10 अंशाच्या खाली नोंदवला गेला आहे. मात्र, गुरुवारनंतर पारा वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील 10 दिवस कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज आहे.
पुढील १० दिवस कमाल आणि किमान तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरवर्षी नाताळला जाणवणारी तीव्र थंडी या वर्षी जाणवण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली. मात्र, वर्षाअखेरीस म्हणजे २९ डिसेंबरपासून हळूहळू थंडीत वाढ होऊन नववर्षात पुन्हा थंडीची अपेक्षा करता येईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत तापमान 4 ते 10 अंशापर्यंत गेले आहे. पहाटेच्या सुमारास वातावरणात गारवा जाणवत आहे. सध्या महाराष्ट्रात जाणवणारी थंडी आज टिकून राहणार आहे. नंतर तापमानात वाढ होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. मंगळवारी सर्वात कमी तापमान अहिल्यानगर येथे 5.6 अंश इतके नोंदवण्यात आले आहे.
नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागून चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही चक्राकार वाऱ्याची स्थिती पुढील एक-दोन दिवसांत तामिळनाडूच्या किनाऱ्याकडे सरकण्याची शक्यता आहे.
पहाटे वातावरणात गारवा असला तरी दुपारच्या वेळी मुंबईत उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. मागील दोन दिवसांपासून पहाटे गारवा असला तरी दुपारी मात्र असह्य उकाडा सहन करावा लागतो. मुंबई कुलाबा आणि सांताक्रुझ येथे तापमान 20 अंश ते 15 अंशांपर्यंत नोंदवले गेले आहे. किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज आहे.