Maharashtra Cabinet Expansion Uddhav Thackeray Shivsena Reacts: "महाराष्ट्राच्या नशिबी जे ईव्हीएमचे सरकार आले, ते नक्की कोणत्या मुहूर्तावर? फडणवीसांचे सरकार असल्यामुळे मुहूर्त हा काढलाच असणार व त्यात काही चुकीचे नाही, पण आधी बहुमत असूनही सरकार बनत नव्हते. रुसवे, फुगवे, रागालोभाने शपथविधी लांबला व आता चाळीसेक जणांचा शपथविधी होऊनही सरकारात सुखशांती दिसत नाही. नाराजांनी उघडपणे आपला अंगार बाहेर काढला आहे. त्या अंगाराच्या कितीही ठिणग्या उडाल्या तरी सरकारला चटके बसणार नाहीत. एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याशिवाय सरकार रेटून नेण्याइतपत बळ भाजपकडे आहे आणि कमी पडलेच तर दोन्ही मित्रपक्ष फोडून बहुमताचा आकडा जुळविण्यासाठी ईडी, सीबीआय, पोलीस फोर्स आहेच," असा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मंत्रिमंडळ विस्तारानंतरच्या नाराजीवरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
"नागपुरात रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. दिल्लीहून याद्या मंजूर होऊन आल्यावर मंत्र्यांनी शपथ घेतली. स्वाभिमान वगैरेसाठी ज्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सोडली अशा शिंदे-अजित पवार गटांच्या याद्याही दिल्लीत अमित शहांच्या नजरेखालून मंजूर होऊन आल्या व त्यानुसार मंत्र्यांच्या शपथग्रहणाचा कार्यक्रम पार पडला. छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण अशा प्रमुख नेत्यांना वगळले आहे. तानाजी सावंत, दीपक केसरकर यांना दिल्लीच्या आदेशाने नारळ देण्यात आला, पण संशयास्पद मृत्यू झालेल्या पूजा चव्हाण प्रकरणातील मंत्री संजय राठोड यांना मंत्रीपदाची शपथ दिल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांचे लाडक्या बहिणींवरचे प्रेम म्हणजे ढोंग आहे हे सिद्ध झाले," असा टोला 'सामना'च्या अग्रलेखामधून लगावण्यात आला आहे.
"गणेश नाईक हे भाजपच्या कोट्यातून मंत्री झाले. त्यांचे चिरंजीव संदीप नाईक हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून निवडणूक लढले होते. शिंदे गटातून अनेकांचे तीन वर्षांपासून टांगलेले कोट या वेळी अंगावर चढले, पण त्या गटातील अनेकांची तडफड ही मनोरंजन करणारी आहे. नितेश राणे, इंद्रनील नाईक, आदिती तटकरे, आकाश फुंडकर, शंभूराजे देसाई, शिवेंद्रराजे भोसले, अतुल सावे, जयकुमार रावल, मेघना बोर्डीकर, भरणेमामा, मकरंद पाटील, बावनकुळे, प्रताप सरनाईक, दादा भुसे अशी मंडळी मंत्रीपदावर विराजमान झाली. एकंदरीत घराणेशाहीवर टीका करणाऱ्यांनी आपापल्या गटातील घराणेशाहीचा ‘मान’ राखला हे स्पष्ट दिसते," असं ठाकरेंच्या पक्षाने मंत्रिमंडळातील चेहऱ्यांच्या निवडीवरुन टीका करताना म्हटलं आहे.
नक्की वाचा >> 'पूजा चव्हाण मृत्यूसंदर्भात फडणवीसांची...', ठाकरेंनी सगळंच काढलं; मोदींच्या 'त्या' इच्छेचाही उल्लेख
"राज्यातील नव्या सरकारचे मंत्रिमंडळ अखेर बनले, पण रडारड संपलेली नाही. प्रकाश सुर्वे, लाड, दरेकर, राम शिंदे, शिवतारे अशा अनेकांना हुंदके फुटले आहेत. अशा नाराज मंडळींच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी नव्या सरकारने एखादे महामंडळ स्थापन करायला हरकत नाही," असा खोचक टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे. "कोणी कितीही आपटली व अश्रू ढाळले तरी ईव्हीएम बहुमताच्या जोरावर सरकार मजबूत आहे. त्यामुळे नवीन मंत्री सध्या बिनखात्याचे असले तरी कारभार रेटून नेला जाईल. भविष्यात शिंदे व अजित पवार निस्तेज होतील आणि काही आदळआपट करायचा प्रयत्न केला तर दोघांच्या दारात ‘ईडी’च्या चौक्या कायमच्या लावल्या जातील! महाराष्ट्र आता थांबणार नाही, पण या पद्धतीने," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.