Maharashtra Board Exam: मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीर

Maharashtra Board Exam: बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान होणार आहे, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 21, 2024, 06:00 PM IST
Maharashtra Board Exam: मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीर title=

Maharashtra Board Exam: राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडणार आहे. तर दहावीच्या परीक्षेसाठी 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत दहावी-बारावीची अंतिम परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे. त्यानुसार यंदा ऑगस्ट महिन्यात दहावी-बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. तसेच वेळापत्रका संदर्भात काही हरकती सूचना असतील तर त्या 23 ऑगस्टपर्यंत राज्य मंडळाने मागविल्या होत्या.

CBSE ने 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षांच्या तारखा केल्या जाहीर; वाचा संपूर्ण टाईम टेबल

 

बारावीच्या परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात आणि दहावीच्या परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केल्या जातात. संबंधित परीक्षांचा ऑनलाईन निकाल मे अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवडयात जाहीर करण्यात येतो. त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणत जुलैच्या तिसर्‍या आठवडयापासून घेतली जाते. 

विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे या बाबींचा सारासार विचार करता सन 2025 ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी दहावी-बारावीची परीक्षा नेहमीपेक्षा 8 ते 10 दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस असून त्याअनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

CBSE ची परीक्षा कधी?

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. दहावी बोर्डाची परीक्षा 18 मार्चला संपणार आहेत. तर बारावीची परीक्षा 4 एप्रिलपर्यंत सुरु असेल. सीबीएसईने परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यासह शाळांना परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी बोर्डाकडे सोपवण्यात सांगण्यात आलं आहे