Maharashtra Politics : परळीत शासन आपल्या कार्यक्रमात मुंडे भावा-बहिणीचं अनोखं मनोमिलन पाहायला मिळालं. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) दोघेही भाऊबहिण एकत्र आलेले दिसले. केवळ औपचारिकता म्हणून हे दोघे एकत्र दिसले नाहीत तर बहिण-भावानं दिलखुलासपणे एकमेकांना साद घातली.. विशेष म्हणजे बीड आणि परळीच्या विकासाचा मुद्दा दोघांच्याही भाषणात आला..
धनंजय मुंडेंनी परळीच्या विकासासाठी केलेल्या पाठपुराव्याची जाहीर भाषणातून आठवण करुन दिली. पंकजा मुंडे आणि मी एकत्र येऊन बीड जिल्ह्याचा विकास करू, असं वचन धनंजय मुंडेंनी परळीत दिलंय. बीड जिल्ह्यातल्या परळीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाआधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह, धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुडेंना श्रद्धाजली वाहिली. यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना ओढून जवळ घेतलं.
फडणवीस-पंकजा मुंडेंचं मनोमिलन
याच कार्यक्रमात आणखी एक मनोमिलन पाहायला मिळालं. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि पंकजा मुंडेंमधले कथित मनभेद संपल्याचं चित्र मंचावर दिसले. फडणवीस-मुंडे दोघंही मंचावर बाजूबाजूला बसले होते. दोघांमध्ये हास्यसंवाद रंगताना दिसला. वर्षभरात देवेंद्र फडणवीसांचे बीडमध्ये दोन ते तीन मोठे कार्यक्रम झाले. मात्र एकाही कार्यक्रमाला पंकजा किंवा प्रीतम मुंडेंनी हजेरी लावली नव्हती. मात्र परळीमध्ये पंकजांनी आधी गोपीनाथ गडावर फडणवीसांचं स्वागत केलं. त्यानंतर मंचावर दोघांमध्ये गप्पाही झाल्या. फडणवीसांनीही मुंडे भावा-बहिणीला एकत्र येण्याची साद घातली..
पंकजा आणि धनंजय मुंडे आज एकाच स्टेजवर आहे. मी त्यांना आव्हान करेल असेच एकत्र राहा, आमच्या तिघांची ताकद तुमच्या पाठिशी उभी करु की परळी असेल बीड असेल, आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठिशी आहोत, तुम्ही सर्व एकत्रित राहिलात तर परळीचंही कल्याण होईल बी़डचंही कल्याण होईल आणि महाराष्ट्राचंही कल्याण होईल असं फडणवीस म्हणाले.
तर आमच्या तिघांबरोबर पंकजा ताईं आणि धनंजय मुंडेंनाही हेलिकॉप्टरमधून घेऊन आलो. आता धनंजय यांना सांगितले आहे बीडचा विकास सर्वांनी एकत्र येत करु, एकदिलाने करुन, सरकार तुमच्या पाठिशी आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिलं. एकंदरीतच शासन आपल्या दारी कार्यक्रमात अनोखं मनोमिलन पाहायला मिळालं..
ज्या परळीवरुन पंकजा आणि धनंजय यांच्यात दुरावा निर्माण झाला होता, त्याच परळीत भावा-बहिणीचं मनोमिलन झालं. तर गोपीनाथगडावर पंकजा आणि फडणवीसही एकत्र येताना दिसले. बीडसाठी मुंडे भाऊ-बहिणीत तह झाल्याची चर्चा रंगलीय. तसंच महायुतीला या एकीचा निश्चित फायदा होईल असाही अंदाज बांधला जातोय..