भाजपाचा हुकमी एक्का थेट केंद्रात? फडणवीसांना मोठी संधी मिळण्याची शक्यता; मोदींच्या निर्णयाकडे लक्ष

Maharashtra Political Crisis: अजित पवारांनी (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वांच्या मनात आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं काय होणार? हाच प्रश्न आहे. अजित पवारांना भाजपाने मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात स्थान दिलं जाऊ शकतं.   

शिवराज यादव | Updated: Jul 3, 2023, 08:49 AM IST
भाजपाचा हुकमी एक्का थेट केंद्रात? फडणवीसांना मोठी संधी मिळण्याची शक्यता; मोदींच्या निर्णयाकडे लक्ष title=

Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) पक्षांतर्गत बंड पुकारत सरकारमध्ये सहभागी झाले असून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांची इच्छा नसतानाही मिळालेलं विरोधी पक्षनेतेपद तसंच शरद पवारांच्या राजीनामानाट्यापासून असलेली मनातील खदखद अखेर रविवारी बंडाच्या रुपात बाहेर पडली. दरम्यान, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता राज्याकडे दोन उपमुख्यमंत्री आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवारांना भाजपाने मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं काय होणार? असा प्रश्न सर्वजण विचारत आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेही नाराज असल्याचं बोललं जात आहे. 

 
प्रफुल्ल पटेलही केंद्रीय मंत्रिमंडळात

अजित पवार यांच्यासह एकूण 9 आमदारांनी रविवारी शपथ घेतली. अजित पवार यांच्या पाठीशी असणाऱ्यांमध्ये शरद पवारांचे निकटवर्तीय प्रफुल्ल पटेल यांचाही समावेश आहे. सर्वात जास्त आश्चर्य प्रफुल्ल पटेल यांच्या नावामुळे वाटत आहे. पदोपदी शरद पवारांच्या पाठीशी सावलीप्रमाणे उभे असणारे प्रफुल्ल पटेल या बंडात कसे सहभागी झाले असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान सूत्रांच्या माहतीनुसार, प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान दिलं जाणार आहे.

देवेंद्र फडणवीस राज्यातून केंद्रात 

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिपरिषदेची बैठक पार पडणार आहे. प्रगती मैदानावरील सभागृहात ही बैठक पार पडणार असून, याच ठिकाणी सप्टेंबरमध्ये जी-20 परिषद होणार आहे. या बैठकीत अजित पवार यांनी पुकारलेलं बंड आणि राज्यातील सत्तेचं समीकरण यासंबंधी चर्चा होण्याची शक्यता आहे. 

अजित पवार यांनी बंड पुकारत सरकारला पाठिंबा दिल्याने सध्या सर्व गणितं बदलली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यात खलबतं सुरु आहेत. त्याचा परिणाम केंद्रीय मंत्रिमंडळावरही होण्याती शक्यता असून संभाव्य फेरबदल केले जाऊ शकतात. 

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे भाजपाचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील भाजपाचा हुकमी एक्का मानल्या जाणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणं जवळपास स्पष्ट आहे. 

दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलात भाजपाच्या मित्रपक्षांनाही संधी मिळू शकते. 20 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याआधी हे बदल जाहीर होतील.