शिंदे गटाच्या आमदारांना निधी न देणारे अजित पवार युतीत कसे? शिंदे म्हणाले, "मी आता मुख्यमंत्री आहे, त्यामुळे..."

Ajit Pawar Joins Maharashtra Government CM Eknath Shinde Reacts: अजित पवार यांच्यासहीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 9 आमदारांनी काल राजभवनामध्ये पार पडलेल्या शपथविधी समारंभामध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 3, 2023, 08:12 AM IST
शिंदे गटाच्या आमदारांना निधी न देणारे अजित पवार युतीत कसे? शिंदे म्हणाले, "मी आता मुख्यमंत्री आहे, त्यामुळे..." title=
अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Ajit Pawar Joins Maharashtra Government CM Eknath Shinde Reacts: रविवारी राज्याच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाराज गट अजित पवारांच्या नेतृत्वाखाली शिंदे सरकारमध्ये सहभागी झाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनामध्ये पार पडलेल्या या शपथविधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबरोबरच अन्य नेतेही उपस्थित होते. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने आता शिंदे गटासंदर्भात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. त्यातही शिंदे गट महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडल्यानंतर देण्यात आलेल्या कारणांमध्ये अजित पवार निधी देत नसल्याचा दावा शिंदे गटातील आमदारांनी केला होता. अजित पवार निधी देत नसल्याचं कारण देणाऱ्या शिंदे गटासोबत आता अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांसहीत सत्तेतील वाटेकरी झाले आहेत. 

एकनाथ शिंदेंचं मोजक्या शब्दांमध्ये उत्तर

अजित पवारांकडून मतदारसंघाच्या विकासासाठी निधी दिला जात नव्हता. त्यामुळे त्यांच्या जाचाला कंटाळून आम्ही सत्तेतून बाहेर पडलो असं विधान शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर केलं होतं. मात्र आता ज्या अजित पवारांना कंटाळून शिंदे गट सत्तेबाहेर पडला त्याच अजित पवारांबरोबर आता सत्तेत रहावं लागणार आहे. यासंदर्भात थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला एकनाथ शिंदेंनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं.

"मी आता मुख्यमंत्री आहे, त्यामुळे..."

अजित पवार निधी देत नव्हते म्हणून बंड केलं असं शिंदे गटाच्या आमदारांनी सांगितलं. आता तेच अजित पवार युतीमध्ये कसे? असा प्रश्न एकनाथ शिंदेंना मीरा भाईंदर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विचारण्यात आला. या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी, "आता मी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे मी कुठलीही तक्रार करणार नाही," असं उत्तर दिलं.

राष्ट्रवादीचा चेहरा कोण विचारलं असता शरद पवार म्हणाले...

रविवारी राष्ट्रवादीच्या आमदारांची अजित पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यानंतर अचानक अजित पवार आणि समर्थक आमदार राजभवनाकडे रवाना झाले. अडीच तासांच्या कालावधीमध्ये राजभवनामध्ये अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी पाचव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे यांच्यासह एकूण 9 नेत्यांनी शपथ घेतली. या शपथविधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला यासंदर्भात काहीही कल्पना नव्हती असं सांगितलं. तसेच अजित पवार गट बाहेर पडल्यानंतर आता राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण असा प्रश्न विचारण्यात आला असता शरद पवारांनी हात वर करत, "शरद पवार" असं उत्तर दिलं.