अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत राणा विरुद्ध अडसूळ वादाच्या नव्या अंकाला सुरुवात झाली आहे. याला निमित्त ठरलाय दर्यापूर विधानसभा मतदारसंघ (Daryapur Vidhansabha Constituency). अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) दर्यापूरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दर्यापूर मतदारसंघात त्यांचे दौरे वाढलेत. त्या रोज लोकांच्या भेटीगाठी घेतायेत. त्याचवेळी शिंदे सेनेचे नेते अभिजीत अडसुळांनीही (Abhijit Adsul) दर्यापूरवर दावा ठोकलाय. त्यामुळे दर्यापूरवरून राणा विरुद्ध अडसूळ वादाचा नवा अंक पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
अमरावतीत कडू-राणा वादाचा नवा अंक
अमरावतीच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघावरून राणा विरुद्ध अडसूळ संघर्ष होण्याची शक्यता आहे. दर्यापूर विधानसभा मतदारसंघात बाहेरचा उमेदवार चालणार नाही, असं म्हणत नाव न घेता माजी खासदार नवनीत राणांनी अभिजीत अडसुळांना टोला लगावला होता. तर दर्यापूर विधानसभेची जागा ही शिवसेनेची हक्काची जागा आहे. त्यामुळे एकदा गप्प राहिलो, आता गप्प राहणार नाही, लढणारच, असं अभिजीत अडसुळ यांनी सुनावलंय.
बच्चू कडू आणि राणांमधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. अमरावतीकरांना येत्या विधानसभेच्या तोंडावर राणा विरुद्ध कडू वादाचा नवा अंक पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राजकुमार पटेलांनी बच्चू कडूंच्या प्रहारची साथ सोडून शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतलाय. यावरून रवी राणांनी बच्चू कडूंवर निशाणा साधलाय. राजकुमार पटेलांना शिंदेंच्या पक्षात पाठवण्याची बच्चू कडूंचीच खेळी आहे, असा दावा राणांनी केलाय. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांना शिवसेना शिंदे गटात बच्चू कडू यांनीच पाठवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात साठ गाठ आहे. बच्चू कडू यांचीच ही खेळी आहे असा खळबळजनक गौप्यस्फोट आमदार रवी राणा यांनी केला आहे.
इतकंच नाही तर मेळघाटमध्ये शिंदे सेनेने राजकुमार पटेलला उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात काम करू असा इशारा रवी राणा यांनी दिला आहे.
आता विधानसभेच्या तोंडावर अमरावतीत कडू विरुद्ध राणा आणि अडसूळ विरुद्ध राणा असे संघर्ष तापण्याची चिन्हं आहेत. दर्यापूर मतदारसंघावरून राणा आणि अडसूळ आमनेसामने उभे ठाकले आहेत. उमेदवारी कुणाला जाहीर होणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.