Maharashtra Weather Alert: यंदा मान्सूनने वेळेआधीच हजेरी लावली आहे. मात्र संपूर्ण जून महिना सरला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाहीये. जुलै महिनाचा पहिला आठवडा गेला तरीदेखील मुसळधार पावसाची अद्यापही प्रतीक्षाच आहे. मुंबईत तर केवळ पावसाच्या तुरळक सरी बरसल्या आहेत. तर, राज्यातील काही भागात पावसाची समाधानकारक स्थिती आहे. मात्र, मुंबईत पावसाने पाठ फिरवली होती. शनिवारी रात्रीपासून मुंबईतील काही भागात पावसाची संततधार सुरू आहे. मुंबईत काल रात्री पासून पावसाची संततधार,जोरात तर कधी हलक्या स्वरूपात सरी कोसळल्या आहेत. रस्ते वाहतूक सुरळीत असली तरी मध्य रेल्वेची लोकल १५ ते वीस मिनिट उशिराने धावत आहे.
पश्चिमी वाऱ्याचा वेग अत्यंत कमी झाल्याने समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला नसल्याने पाऊस थांबला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. हवामानातील बदलांमुळं संपूर्ण राज्यात अद्यापही पुरेसा पाऊस झाला नाहीये. सुरुवातीला जुलै महिन्यात पाऊस अपेक्षित असेल असा अंदाज हवामान विभागाने दिला होता. मात्र, हवामानातील बदलामुळं अद्यापही मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत मुंबईकर आहेत.
रविवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, सोमवारी आणि मंगळवारी साताऱ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात मराठवाडा वगळता 10 जुलैपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही मध्यम पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसासाठी योग्य स्थिती आवश्यक आहे. समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल.
मुंबईसह महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवसांनंतर मुसळधार पाऊस बरसेल. तो पर्यंत कोकणपट्टीसह राज्याच्या काही भागांत मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ७ जुलै रोजी कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे आगमन झाले असले तरी धरणांमधील पाणीसाठा मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच नोंदविण्यात आला आहे. राज्यात जवळपास ९८५ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू असल्याचे माहिती जलसंपदा मंत्रालयाच्या अहवालातून समोर आली आहे. राज्यातील एकूण ७९५ गावे आणि ३ हजार १५७ वाड्यांमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू असल्याचे या आकडेवारीतून समोर आले आहे.
सात धरणांच्या क्षेत्रात अद्यापही समाधानकारक पाऊस नाहीये. त्यामुळं मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे. परिस्थिती चिंताजनक असून सात धरणांत नऊ टक्के पाणीसाठा आहे. तसंच, राखीव जलसाठ्याचा वापर सध्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.