कोल्हापूर : कोल्हापुरातल्या तीन जागांवर युतीच्या पराभवास शिवसेना खासदार संजय मंडलिक जबाबदार आहेत, असा थेट आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. लोकसभेला बंटी पाटील यांनी केलेल्या मदतीची परतफेड करण्यासाठी मंडलिकांनी हे केलं असून शिवसैनिकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे, असा टोलाही दादांनी लगावलाय.
कोल्हापुरात आज झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या पराभवाचा उहापोह केला. गेल्या पाच वर्षांत अनेक कामं केली असतानाही ज्यांनी एवढ्या वर्षांत काहीच केलं नाही, त्यांना मतं दिली आहेत. याबाबत आम्ही जनतेला प्रश्न विचारणार आहोत, असं ते म्हणाले.
आम्ही कुठे कमी पडलो.. आम्ही कशात चुकलं हे जनतेनं सांगावं... कारण आम्हाला ते समजून घ्यायच आहे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना याचे सरकार येणार आहेच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या प्रेस नोटमघ्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाची कुंडली मांडण्यात आली आहे. तसेच सलाम कोल्हापूर करांना सगळ जग सुधारेल पण आम्ही नाही सुधारणार... नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध म्हणून प्रगती नाही, हे वाक्य लिहिले आहे. पण यासंदर्भात त्यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी यावरून घुमजाव केला.