प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : लग्न म्हणजे आयुष्यातली नवी इनिंग. मात्र याच इनिंगची सुरुवात करताना अनेक लग्नाळू मुलांची फसवणूक होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. मुलींच्या संख्येचं प्रमाण कमी झाल्याने अनेकांना मुली मिळत नाहीत. काहीही करुन लग्न करायचं असतं आणि इथेच सुरु होता फसवणूक (Fraud) करणाऱ्या टोळीचा खरा खेळ. नोकरी नसलेल्या शेतकरी कुटुंबातल्या मुलांची लग्न वेळेत होत नाहीत. अशाच लग्नाळू मुलांना आणि त्यांच्या पालकांना मुली पुरवण्याऱ्या टोळ्या जाळ्यात ओढतात. आणि मग लग्नाच्या बहाण्याने त्यांची फसवणूक केली जाते. असाच बोगस लग्नाचा प्रकार कोल्हापूरच्या (Kolhapur) शिरोळमध्ये उघडकीस आलाय.
कोल्हापूरात 'डॉली की डोली'
या टोळीची मोडस ऑपरेंडीही समोर आली आहे. लग्न जुळविणारे मध्यस्थी डॉली की डोली (Dolly Ki Doli) टोळींपर्यंत नातेवाईकांना नेतात. लग्न ठरल्यावर खुशाली म्हणून मुलाकडे दोन ते तीन लाखांची मागणी मध्यस्थी करतात. लग्न जमतंय म्हणून काही पालक आणि लग्नाळू मुलं लाखो रुपये मध्यस्थीला देण्यास तयार होतात. लग्न ठरल्यावर मध्यस्थी ठरलेले पैसे मुलाकडून वसुल करतो. लग्नात मुलीच्या अंगावर जास्तीत जास्त दागिने घालण्यासाठी मध्यस्थी भाग पाडतो. मुलीच्या अंगावर भरपूर दागिने घालून मुलाचे पालक लग्न लावून देतात. लग्नानंतर मुलगी दोन चार दिवस सासरी नांदते. त्यानंतर काहीच दिवसांत नवरी दागिन्यांसह अचानक रफूचक्कर होते. लग्न झालेल्या नवरीचा थांगपत्ताही लागत नाही
नवरी दागिन्यांसह फरार झाल्यानंतर फसवणूक झाल्याचं नवरदेवाच्या आणि पालकांच्याही लक्षात येतं. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. मुलाची घोर फसवणूक झाल्याचं पालकांच्या लक्षात येतं. मात्र इज्जतीच्या कारणाने ते लपवून ठेवलं जातं. अशाच डॉली की डोली टोळ्यांमुळे सीमाभागात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. खास करुन महाराष्ट्राच्या सीमाभागात तसंच ज्या समाजामध्ये मुलींची संख्या कमी आहे तिथे लग्न लावून देऊन आर्थिक फसवणूक करण्याचं प्रमाण जास्त आहे..
नवरदेव खरा मात्र लग्न खोटं असे अनेक प्रकार राज्यात घडतायत.. खोटं लग्न करुन पैसे उकळणा-या टोळ्यांचा सुळसुळाट झालाय. तेव्हा शुभमंगल करताना सावधान व्हा.. नाहीतर आर्थिक फसवणूक आणि आयुष्यभराचा मानसिक धक्का सहन करावा लागेल.