'मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला', फडणवीस थेट नाव घेतच बोलले, 'सुप्रिया सुळे तर...'

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला असल्याचं ते म्हणाले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Dec 16, 2023, 12:44 PM IST
'मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला', फडणवीस थेट नाव घेतच बोलले, 'सुप्रिया सुळे तर...' title=

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला असल्याचं ते म्हणाले आहेत. 2024 च्या निवडणुकांसाठी भाजपाने कंबर कसली आहे. यासाठी नागपुरात भाजपाद्वारे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना विरोधकांना लक्ष्य केलं. 

"मराठा आरक्षणासाठी मोठी आंदोलनं सुरु आहेत. इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना सुप्रिया सुळे मराठा आरक्षणाशिवाय इतर महत्त्वाचे प्रश्न नाहीत का असं सांगत निघून गेल्या होत्या. ज्यांना वारंवार संधी मिळाली त्यांच्या मनात असतं तर मंडळ आयोग लागू झाला तेव्हा आऱक्षण देता आलं असतं. कोण कोणत्या यादीत आहे हेदेखील पाहिलं नाही," अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली. 

"त्यांना आरक्षण द्यायचंच नव्हतं. त्यांना समाजांना झुंजवत ठेवण्यात जास्त रस आहे. त्यांचं राजकारण म्हणजे लोक झुंजत राहिले तर आपल्याकडे नेतेपद येईल," असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

"महाराष्ट्रात आपलं सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं. फक्त दिलं नाही तर त्याचवेळी हायकोर्टात ते टिकवून दाखवलं. सर्वोच्च न्यायालयात आपण असेपर्यंत ते टिकलं. आपलं सरकार गेल्यानंतर त्यावर स्थगिती आली. त्यामुळे आपली वचनबद्धता पक्की आहे. मुख्यमत्र्यांच्या नेतृत्वात आपण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी यशस्वी प्रयत्न  करणार आहोत. पण कोणत्याही प्रकारे ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही," असा पुनरुच्चार त्यांनी केला.

"निवडणुकीतील विजयानंतर आपलं मनोबल जसं उंचावलं आहे तसं विरोधकांच खच्चीकरण झालं आहे. ते आता डॅमेजिंग मानसिकतेत पोहोचले आहेत. आपण वर्षानुवर्षं विरोधी पक्षात काम केलं, आपण सत्तेचे विरोधक होतो. देशाचे, विकासाचे, समाजाचे विरोधक नव्हतो. आपण एका विचारधारेला विरोध केला होता. त्यामुळेच देशाची हानी होईल, समाजात विघटन होईल असं वर्तन, वक्तव्य आपण कधी केलं नाही. पण दुर्दैवाने सध्या विरोधी पक्ष अशा मानसिकतेत गेला आहे की अस्तित्वासाठी काहीही करायला तयार आहेत. खोटं बोला, रेटून बोला सुरु आहे. त्यांना समाजाची, देशाची चिंता नाही. त्यांच्या वागणुकीच दूरगामी परिणाम काय होईल याचीही त्यांना चिंता नाही. त्यामुळे आपल्याला सावध राहण्याची गरज आहे," अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी यावेळीकेली. 

"विरोधक रोज आपल्या भूमिका बदलत आहेत. उद्धव ठाकरेंची सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस ज्या प्रकारच्या भूमिका घेत आहेत, त्यांना केवळ सत्तेच्या राजकारणात आपलं अस्तित्व टिकवायचं आहे. यामुळे येणारे दिवस अधिक सावधानतेने काढावे लागणार आहेत," असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.