Ajit Pawar Tweet on Mumbai Rain: मुंबईला मुसळधार पावसाने झोडपलं असून, ठिकठिकाणी पाणी साचल्याने सर्वसामान्यांचे हाल झाले आहेत. रविवारी मध्यरात्रीपासून ते सोमवार सकाळपर्यंत मुंबईत 267.9 मिलिमीटर पाऊस पडला आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे सोमवारी पहाटे रस्त्यांसह लोकलसेवाही ठप्प झाली होती. सकाळी कामावर निघालेले अनेक चाकरमानी ठिकठिकाणी अडकून पडले होते. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल रात्री मुंबईत 6 तासांमध्ये 300 मिमी पाऊस पडला अशी माहिती दिली आहे. तसंच पावसाची माहिती देताना एक सूचक विधान केलं आहे.
भारत आणि जगभरातील शहरांप्रमाणेच मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागत आहे असं अजित पवार म्हणाले आहेत. तसंच हवामान बदलामुळे भविष्यात येणाऱ्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेऊन आपण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत असंही त्यांनी सांगितलं आहे.
अजित पवारांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "काल रात्री मुंबईत सहा तासांमध्ये 300 मिमी पाऊस पडला आहे. हा मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्या 10 टक्के पाऊस आहे. भारत आणि जगभरातील शहरांप्रमाणेच मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागत आहे".
काल रात्री मुंबईत सहा तासांमध्ये 300 मिमी पाऊस पडला आहे.
हा मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्या १० टक्के पाऊस आहे. भारत आणि जगभरातील शहरांप्रमाणेच मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागत आहे. हवामान बदलामुळे भविष्यात येणाऱ्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेऊन आपण मुंबई…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 8, 2024
"हवामान बदलामुळे भविष्यात येणाऱ्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेऊन आपण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. वर्षातील 365 दिवस दुष्काळ, पूर, वादळ यांचा सामना करण्यासाठी आपण योग्य ती पावले उचलली पाहिजे. त्यासोबतच अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे," असंही त्यांनी सांगितलं आहे.
हवामान खात्याने मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असं आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर डिस्टन्स अँड ऑनलाइन एज्युकेशन (आयडॉल ) ज्या परीक्षा सकाळच्या सत्रात होत्या त्या परीक्षा मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात आले आहेत. आजच्या सर्व परीक्षा 13 जुलै रोजी होणार असल्याचा मुंबई विद्यापीठाने नोटीस जारी करत सांगितले आहेत. तसंच सर्व शाळांना सुट्टी जाहीर कऱण्यात आली आहे.