महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु झालाय विचित्र ट्रेंड! निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवारांची तात्पुरती व्यवस्था

Mahayuti Seat Sharing : महायुतीनं जागावाटपात आघाडी घेतली असली तरी निष्ठावंत नाराज झाले आहेत. कारण भाजपने आपल्या इच्छुकांना मित्र पक्षात घेऊन संधी दिली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Oct 28, 2024, 08:44 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु झालाय विचित्र ट्रेंड! निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवारांची तात्पुरती व्यवस्था  title=

Maharashtra Assembly Elections 2024 :  महायुतीनं जागावाटपात आघाडी घेतलीय. भाजपनं तर आतापर्यंत तब्बल 146 उमेदवार जाहीर केलेत.  विशेष म्हणजे जागावाटपात मित्रपक्षाकडे गेलेल्या जागेवरही भाजपमधील इच्छुकांनी मित्रपक्षात प्रवेश करून संधी साधलीय.  भाजपसोडून शिवसेना आणि राष्ट्रवादीत गेलेल्या किती जणांनी उमेदवारीची संधी साधलीय. 

निलेश राणे, राजकुमार बडोले, संजयकाका पाटील, मुरजी पटेल... हे सगळे कट्टर भाजप नेते.... पण विधानसभेसाठी यांनी मनात कमळ ठेऊन हाती धनुष्यबाण आणि घड्याळ बांधलंय. निवडणुकीसाठी उमेदवारी देताना पक्षातील निष्ठावान नेता किंवा कार्यकर्त्यांला संधी दिली जाते अशी एक साधारण परंपरा आहे. मात्र,आता या परंपरेला छेद देत मित्र पक्षातील इच्छुकांना आयात करून उमेदवारी देण्याची एक नवीन परंपरा सुरू झालीय. 2019मध्ये सुरु झालेला ट्रेंड यावेळी तर सर्रास वापरला गेलाय. महायुतीच्या उमेदवार यादीवर नजर टाकल्यास तब्बल 9 जणांनी तात्पुरती व्यवस्था म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूकीच्या मैदानात उडी घेतलीय.

भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा हातात धनुष्यबाण घेत कुडाळ मालवणमधून उमेदवारी मिळवलीय.  पालघरमध्ये भाजपच्या राजेंद्र गावीत यांनी धनुष्यबाण घेतल्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर झालीय. भाजपमधून शिवसेनेत आलेल्या मुरजी पटेल यांना अंधेरी पूर्व येथून एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिलीय तर बोईसरमधून विलास तरे यांनी भाजप सोडून धनुष्यबाणावर निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतलीय. भिवंडी पूर्वमधून संतोष शेट्टी, बार्शीमधून राजेंद्र राऊत यांना शिवसेनेनं उमेदवारी दिलीय.  शिवसेनेप्रमाणेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीन भाजपमधून आलेल्या तीन जणांना उमेदवारी दिलीय. 

सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत तासगाव कवठे महांकाळ येथून उमेदवारी मिळवलीय. अशोक चव्हाणांच्या प्रवेशानंतर नाराज असलेले नांदेडचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी हातात घड्याळ बांधून लोह्यातून उमेदवारी मिळवलीय. तर गोदिंया जिल्ह्यात भाजपचे ज्येष्ठ नेते राजकुमार बडोले यांना अजित पवारांनी अर्जुनी मोरगावातून  उमेदवारी दिलीय. भाजपचे आतापर्यंत 146 उमेदवार जाहीर केलेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून लढणाऱ्या उमेदवारांची संख्या धरल्यास भाजप त्यांच्या मनातील 162चा आकडा गाठणार यात शंका नाही.