Devendra Fadnavis On Sharad Pawar CM Post: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'झी 24 तास'ला 'टू द पॉइण्ट' या कार्यक्रमात दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये मुख्यमंत्रिपदासंदर्भात धक्कादायक दावा केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदासंदर्भात इच्छा बोलून दाखवल्याचं आपल्याला उद्धव ठाकरेंच्या पक्षातील बड्या नेत्याने सांगितल्याचा दावा फडणवीसांनी केला आहे. हा दावा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
उद्धव ठाकरेंना पक्ष पुत्राकडे म्हणजेच आदित्य ठाकरेंकडे सोपवायचा होता तर शरद पवारांनाही त्यांची कन्या सुप्रिया सुळेंकडे पक्ष सोपवायचा असल्याने हे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्याचा दावा फडणवीसांनी विशेष मुलाखतीत केला. यावरुनच त्यांना, "पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचा आहे. 2019 ला जे काही घडलं किंवा पवारांनी उद्धव ठाकरेंना पुढे केलं हे सारं कुठे तरी कनेक्टेड आहे असं वाटतं का? उद्धव ठाकरेंना सत्तेतून बाहेर काढावं आणि सुप्रिया सुळेंना बसवावं असं काही आहे का?" असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर फडणवीसांनी, "उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षातील फार मोठ्या नेत्याने मला सांगितलं की, पवारसाहेब खासगीत त्यांना बोलले होते की पाच वर्ष कसं ठेवायचं यांना (उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री)? आमचाही पक्ष असून आमचे त्यांच्यापेक्षा दोनच कमी आहेत. त्यामुळे आम्हाला देखील मुख्यमंत्रिपद मिळालं पाहिजे. अर्थात ती वेळच आली नाही पक्ष फुटला आणि आमचं सरकार आलं," असं खळबळजनक उत्तर दिलं.
नक्की वाचा >> बाळासाहेब कनेक्शनमुळे राज ठाकरेंचा मोठा निर्णय? मनसैनिकांचा हिरमोड; म्हणाले, 'दीड दिवसांचा...'
"शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाची मागणी केली होती?" असा प्रश्न विचारण्यात आला असता फडणवीसांनी, "मागणी केली नाही इच्छा बोलून दाखवली," असं उत्तर दिलं. "आताही त्यांची तशी इच्छा असेल असं तुम्हाला वाटतं?" असा पुढचा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हे का जाहीर केलं नाही याबद्दल भाष्य केलं. "अतिशय मोठ्या नेत्याने मला सांगितलं. त्यांनी मागणी केली नाही (मुख्यमंत्री पदाची) इच्छा बोलून दाखवली. 100 टक्के त्यांची आताही इच्छा असेल. असं जर नसतं तर लोकसभेच्या वेळी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना प्रोजेक्ट केलं. लोकसभेनंतर बंद खोलीत तरी करा, एखदा तरी म्हणा, कानात तरी सांगा 100 पर्याय आणि विनवण्या केल्यानंतरही ठामपणे त्यांनी सांगितलं की आम्ही मुख्यमंत्री घोषित करणार नाही. कारण काँग्रेसला स्वत:चा मुख्यमंत्री करायचा आहे आणि शरद पवारांना सुप्रियाताईंना करायचं आहे," असं फडणवीस म्हणाले.
नक्की वाचा >> 'राज ठाकरेंना सोबत घेतलं असतं तर..'; फडणवीसांनी सांगितलं BJP-मनसे युती फिस्कटण्याचं खरं कारण
फडणवीसांच्या या दाव्यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता संजय राऊतांनी हा दावा खोडून काढला. "त्यांना वाटलं शिवसेना काय आपल्या पायाशीच येणार. तसं झालं नाही. राजकारण शिवसेनेलाही येतं. तुम्ही मुख्यमंत्री पद नाकारुन जो आमचा अपमान केला ते मुख्यमंत्रिपद आम्ही घेतलं. तुम्ही आमच्या मधले गद्दार घेऊन सरकार पाडलं हे ठिक आहे. शरद पवारांनी किंवा काँग्रेस पक्षाने हे सरकार आणि मुख्यमंत्रिपद पाच वर्ष टीकवायचं अशी कमिटमेंट होती. मागील दोन अडीच वर्षांपासून फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग लागलेला आहे. महाराष्ट्राचं त्यामुळे नुकसान झालं आहे," असं राऊत म्हणाले.