भाजपाच्या जास्त जागा असताना मुख्यमंत्री कोण होणार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, 'अमित शाह यांनी...'

Devendra Fadnavis on Who will be Chief Minister: महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळणार हे आता स्पष्ट झालं आहे. दरम्यान महायुतील भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच आता देवेंद्र फडणवीस यांनी यावर विधान केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 23, 2024, 03:35 PM IST
भाजपाच्या जास्त जागा असताना मुख्यमंत्री कोण होणार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, 'अमित शाह यांनी...' title=

Devendra Fadnavis on Who will be Chief Minister: महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळणार हे आता स्पष्ट झालं आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, महायुतीला 225 जागा मिळत असल्याचं दिसत असून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. भाजपाला तब्बल 130 जागा मिळत आहेत. महायुतील भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्याने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच आता देवेंद्र फडणवीस यांनी यावर विधान केलं आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा लाडक्या बहिणींचा आशीर्वाद असल्याचं म्हटलं आहे. तसंच आम्ही आधुनिक काळातील अभिमन्यू असल्याचं म्हटलं आहे. 

भाजपाचा मुख्यमंत्री होणार का? असं विचारलं असता ते म्हणाले, "याबातीत अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितलं आहे की, मुख्यमंत्रीपद हे कोणत्याही निकषावर नाही, तर तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून ठरवतील. एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आणि आमचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जो निर्णय घेतील तो मान्य असेल. याबाबत कोणताही वाद नाही".

एकाप्रकारे लोकांनी आपला निर्णय दिला आहे. लोकांनी एकनाथ शिंदेंना खरी शिवसेना म्हणून स्विकरलं आहे. आणि मूळ राष्ट्रवादी अजित पवारांची ठरली आहे असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. 

"आजच्या निकालाने संपूर्ण महाराष्ट्र नरेंद्र मोदींच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट झालं आहे. मोदींनी 'एक है तो सेफ है' चा नारा दिला होता. महाराष्ट्रातील सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन हा नारा यशस्वी केला आहे. आमच्या लाडक्या बहिणींचे विशेष आभार आहेत. ज्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले आहेत," अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

पुढे ते म्हणाले, "जो फेक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता, त्याविरोधात लढणाऱ्या संघटनांचा हा विजय आहे. जे मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला होता, त्याच्याविरोधात जनजागृती करणारे विविध पंथांचे संत त्यांचाही हा विजय आहे. गावात, पाड्यात, वाडीत, वस्तीत जाऊन प्रचार केला त्या सर्वांचा हा विजय आहे. महायुतीचे लाखो कार्यकर्ते त्यांचाही विजय आहे. आमच्या एकजुटीचा हा विजय आहे. यानिमित्ताने अमित शाह यांचे मी आभार मानतो, ज्यांनी महाराष्ट्रात येऊन कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरली. सगळ्या राष्ट्रीय नेतृत्वाने चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं".

"महाराष्ट्राच्या जनतेपुढे आम्ही नतमस्तक आहोत. यापेक्षा जास्त काही बोलताच येत नाही. हा साष्टांग दंडवत महाराष्ट्राच्या जनतेला आहे, ज्यांनी हे प्रेम दिलं आहे. विषारी प्रचाराला महाराष्ट्रातील जनतेने आपल्या  कृतीतून उत्तर दिलं. त्यांचे मी आभार मानतो, ज्यांनी ही एकी दाखवली," असंही ते म्हणाले. तसंच आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, आम्ही चक्रव्यूह तोडून टाकू असं सांगितलं होतं. हे चक्रव्यूह आम्ही तोडलं असून, महाराष्ट्र मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असंही ते म्हणाले.